आधार कार्डावर दोन टक्के व्याजाने कर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 12:20 PM2021-12-15T12:20:25+5:302021-12-15T12:20:42+5:30
Loan On Addhaar Card : तुम्हालाही आला असेल असा मेसेज तर सावधान.
नवी दिल्ली : आधार कार्ड सर्वांसाठी अनेक कामांसाठी लागणारा अतिशय महत्त्वाचा डाॅक्युमेंट आहे. आधार कार्डबाबत अनेकदा साेशल मीडियावर माहिती व्हायरल हाेते. प्रत्येक वेळी ती माहिती खरीच असते, असे नाही. सध्या असाच एक मेसेज साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. केंद्र सरकार आधार कार्डवर कर्ज देत असल्याचा हा मेसेज आहे. तुम्हालाही हा मेसेज आला असेल तर सावध व्हा. सायबर गुन्हेगार तुम्हाला त्यातून जाळ्यात अडकविण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान याेजनेंतर्गत सरकार २ टक्के व्याजदराने कर्ज देत असून, ५० टक्के सवलतदेखील मिळणार असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र, फॅक्ट चेकमध्ये हा मेसेज खाेटा असल्याचे आढळून आले आहे. सरकारने अशा प्रकारची काेणतीही याेजना आणलेली नाही. त्यामुळे लाेकांनी अशा मेसेजपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वेळीच धाेका ओळखा
याबाबत पीआयबी फॅक्ट चेकने ट्वीट करून माहिती दिली आहे. लाेकांनी असे मेसेज शेअरदेखील करू नयेत, असे सांगण्यात आले आहे. अशा मेसेजमधून सायबर गुन्हेगार तुमची माहिती मिळवून काेणत्याही क्षणी तुमचे बँक खाते साफ करू शकतात. त्यामुळे आपली वैयक्तिक माहिती काेणासाेबतही शेअर करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.