चेन्नई पोलिसांकडून लोन अॅप रॅकेटचा भांडाफोड; चीनच्या दोन नागरिकांसह चार जणांना अटक
By जयदीप दाभोळकर | Published: January 3, 2021 11:01 AM2021-01-03T11:01:21+5:302021-01-03T11:04:39+5:30
चारही आरोपी अॅपद्वारे अधिक व्याजदरात देत होते कर्ज, तसंच रक्कम भरण्यासाठी दिली जात होती धमकी
तामिळनाडू पोलिसांनी लोन अॅप रॅकेटचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी चीनच्या दोन नागरिकांसहित चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी अॅपद्वारे अधिक व्याजदरात कर्ज देत होते आणि ते वसूल करण्यासाठी धमकीचे फोनही करत असल्याची माहिती समोर आली आहे.
ऑनलाइन कर्ज देणं आणि फोनवरून धमक्या देण्याच्या एका तक्रारीवरून चेन्नईच्या सेंट्रल क्राईम ब्रान्चनं एक तपास सुरू केला होता. "लॉकडाउनमुळे आपण आर्थिक संकटात सापडलो होतो. सोशल मीडियावरील एका जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला एम रूपया या अॅपबद्दल माहिती मिळाली. तसंच हे त्वरित कर्ज देणारं अॅप होतं," अशी माहिती तक्रारदारानं पोलिसांना दिली. तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार त्यानं या अॅपच्या मदतीनं ५ हजार रूपयांची रक्कम घेतली. तसंच यासाठी त्याच्याकडून १५०० रूपये व्याज म्हणून आकारण्यात आले. यानंतर त्याच्याकडून १०० रूपयांवर २ टक्क्यानं व्याज घेण्यात आलं. त्यानंतर धमकीचे फोनही येऊ लागल्याचं तक्रारकदारां सांगितलं.
यानंतर चेन्नई क्राईम ब्रान्चनं या प्रकरणाचा तपास सुरू केला. तसंच अनेक ऑनलाइन स्वाक्षऱ्यांच्या आधारावर, आरोपींच्या बंगळुरूतील एका कॉल सेंटरबाबत माहिती मिळाली. हे कॉल सेंटर कॉल टू किंडल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, प्रमोदा आणि पावन द्वारे चालवलं जात होतं. यामध्ये जळपास ११० जण कार्यरत होते. हे कर्मचारी ९ निरनिराळ्या अॅपवरून लोन देण्याचं काम करत असल्याचंही तपासातून समोर आलं.
आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या लोकांना त्यांच्याकडून लक्ष्य केलं जात होतं. हे लोकं त्यांना अधिक व्याजदरावर कर्ज देत असतं आणि पैसे पुन्हा भरण्यासाठीही फोनद्वारे धमकी दिली जात होती. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर प्रमोदा आणि पावननं कथितरित्या दोन चिनी नागरिकांसाठी काम करत असल्याचं कबूल केलं. सध्या चारही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.