दहशत पसरविणाऱ्या तिघांवर स्थानबद्धतेची कारवाई, पाेलीस आयुक्तांचा बडगा
By जितेंद्र कालेकर | Published: May 19, 2023 09:05 PM2023-05-19T21:05:25+5:302023-05-19T21:05:50+5:30
एमपीडीए अंतर्गत एक वर्ष येरवडा कारागृहात रवानगी
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शहर पोलीस आयुक्तालयामधील कासारवडवली, कळवा आणि उल्हासनगर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दहशत पसरविणाऱ्या घाेडबंदर राेडवरील डाेंगरपाडा येथील कुप्रसिद्ध गुंड धीरज ऊर्फ विकी संतोष रेड्डी (२९), कळवा पूर्व येथील कुप्रसिद्ध गुंड सोनू ओमकार पवार (२६) आणि उल्हासनगर नंबर २ येथील कुप्रसिद्ध गुंड जग्गू सरदार ऊर्फ जगदीश तीरथसिंग लबाना (४०) या अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांनी केली आहे. तिघांनाही एक वर्षासाठी पुण्याच्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
विकी रेड्डी याच्यावर कासारवडवली पोलिस ठाण्यात ठार मारण्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, दुखापत, दमदाटी आणि शिवीगाळ करणे, धमकी देणे, ठार मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगणे असे पाच गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करून त्याला पुणे येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध केले आहे. तर सोनू पवार याच्यावरही कळवा पोलिस ठाण्यात जबरी चोरी करण्याचा प्रयत्न आणि ठार मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच जगदीश लबाना याच्यावर उल्हासनगर पोलिस ठाण्यात खंडणी, दुखापत, विनयभंग, शिवीगाळ, धमकी देणे असे ६ गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध ही कारवाई केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
या वर्षात एकूण ९ जणांना केले स्थानबद्ध
ठाणे पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्या आणि सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार २०२३ मध्ये आतापर्यंत ९ सराईत तसेच अट्टल गुन्हेगारांविरोधात एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई केली आहे.