विदारक परिणाम! आधीच कर्जबाजारी त्यात लॉकडाऊन; त्याच्यावर आली पोटच्या मुलाला विकण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 04:01 PM2021-05-23T16:01:18+5:302021-05-23T16:10:28+5:30
Crime news: साईनाथ भोईर हा मूळचा मुरबाडचा आहे. तो सध्या शहाड येथे राहतो. रिक्षा चालवून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला पत्नी आणि सहा मुले आहेत.
कल्याण- आधीच तो कर्जबाजारी होता. त्यात लॉकडाऊन सुरु असल्याने त्याचा रिक्षाचा धंदा होत नव्हता. त्याच्यावर पत्नी आणि सहा मुलांचा बोजा असताना त्याच्या संपर्कात एक महिला एजंट आली. तिने त्याच्याकडून पाच महिन्याचा मुलगा विकत घेतला. याची कुणकुण ठाणो मानवी तस्करी विराेधी पथकाला लागली होती. या पथकाने कल्याण रेल्वे स्टेशनला सापळा रचून आई वडिलांसह महिला एजंटला अटक केली आहे. या तिघांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे. (Police arrest three people in human trafficing.)
साईनाथ भोईर हा मूळचा मुरबाडचा आहे. तो सध्या शहाड येथे राहतो. रिक्षा चालवून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला पत्नी आणि सहा मुले आहेत. सहा मुलांपैकी तीन मुली आणि तीन मुलगे आहेत. मागच्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झाला. लॉकडाऊन सुरु होण्याआधीच साईनाथवर कर्ज होते. त्यात लॉकडाऊन सुरु झाल्याने कुटुंबाचा घर खर्च कसा भागवायचा हे त्याच्यासमोरचे मोठे आव्हान होते. लॉकडाऊनमुळे तो आर्थिक विवंचनेत होता. त्याच्या संपर्कात मानसी जाधव नावाची महिला आली. मानसी ही बदलापूर येथे राहते. ती सामाजिक संस्थेत कामाला होती.
मानसीने साईनाथला त्याचा पाच महिन्याचा मुलगा विकत मागितला. त्या बदल्यात साईनाथला ९० हजार रुपये देण्याचे कबूल केले. मानसीला या मुलासाठी दुसऱ्याकडून २ लाख रुपये मिळणार होते. मानसी, साईनाथ आणि त्याची पत्नी मुलाला घेऊन कल्याण स्टेशन परिसरातील दीपक हॉटेल येथे येणार असल्याची माहिती मानवी तस्करी विरोधी विभागाच्या ठाणे कार्यालयास मिळाली. या विभागाचे अधिकारी अशोक कडलक यांनी सापळा रचून मानसी, साईनाथ व त्याची पत्नी या तिघांना अटक केली आहे. त्यांना महात्मा फुले पोलिसांच्या हवाली केले आहे.
मानसी मुले खरेदी विक्रीच्या मानवी तस्करीचा व्यवहार किती दिवसापासून करीत आहे. ती हा मुलगा कोणाला दोन लाख रुपयात विकणार होती. या विविध अंगाने पोलीस या गंभीर प्रकरणाचा तपास करीत आहेत.