लॉकडाऊनमध्ये धारावीतून कल्याणपर्यंत प्रवास करणं पडलं महागात, दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 01:35 PM2020-04-22T13:35:51+5:302020-04-22T13:48:19+5:30
भारतात कोरोना साथीच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून ३ मे पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी जाहीर केलेली आहे.
सचिन सागरे
कल्याण : कोरोनाच्याबाबतीत मुंबईतील अतिसंवेदनशील भाग समजल्या जाणाऱ्या धारावीतून बाईकवर अटाळी- आंबिवलीपर्यंत प्रवास करणाऱ्या दोघांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
भारतात कोरोना साथीच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून ३ मे पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी जाहीर केलेली आहे. या संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीस वाहनांने प्रवास करण्यात मनाई करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनीदेखील कोरोना कंटेनमेंट झोनमधील नागरिक इतर भागात गेल्याचे आढळून आल्यास त्यांना महापालिकेच्या क्वारंटाईन कक्षात दाखल करून १४ दिवस ठेवणेबाबत निर्देश दिलेले आहेत.
त्यानंतरही डोंबिवली येथे राहणाऱ्या आणि धारावी येथे काम करणाऱ्या एका इसमाने धारावीसारख्या कोव्हिड अतिसंवेदनशील भागातून एका महिलेला दुचाकीवरून अटाळी-आंबिवली येथे आणून सोडले. या इसमाने कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या आदेशाचे जाणीवपूर्वक पालन न करता धारावी- मुंबई ते अटाळी-आंबिवली असा प्रवास करून संचारबंदीचे उल्लंघन केल्याने दोन्ही व्यक्तीविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या अनुषंगाने भंग केल्यामुळे कोव्हिड-१९ उपाययोजना २०२० नियम ११ नुसार भारतीय दंड संहिता (५४ ऑफ १८६०) कलम १८८,२६९,२७० व साथरोग प्रतिबंधक कायदा १९९७ चे कलम २,३ आणि ४ अन्वये खडकपाडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. तसेच या इसमाला आणि महिलेला क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.