लॉकडाऊन नावालाच; बारमध्ये मध्यरात्रीपर्यंत झिंगाट; छतावरही रंगतात पार्ट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 12:43 AM2021-01-24T00:43:32+5:302021-01-24T00:43:50+5:30
रात्री दहानंतर होतेय मद्यविक्री, ३० जानेवारीपर्यंतच्या असलेल्या लॉकडाऊनचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेलमध्ये मद्यपानाला अप्रत्यक्षपणे पूर्णपणे मोकळीक दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात ३० जानेवारीपर्यंत लॉकडाऊन असल्याने रात्री ठरलेल्या वेळेत आस्थापने बंद करणे आवश्यक आहे. यानंतरही बार व मद्यविक्री केंद्रांना नियमातून सूट दिली जात आहे.
३० जानेवारीपर्यंतच्या असलेल्या लॉकडाऊनचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. रात्री ठरवून दिलेल्या वेळेत विविध आस्थापने बंद करणे आवश्यक आहे; परंतु नवी मुंबईसह पनवेल व परिसरात बार व मद्यविक्री केंद्रांना मात्र त्यातून वगळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रात्री १२ नंतर अनेक बार सुरू ठेवले जात असून, त्यापैकी काही बारच्या छतावर मद्यपानाला मुभा दिली जात आहे, तर पनवेल परिसरात चायनीज व ढाबा संस्कृर्ती मोकाट असून, त्याठिकाणी उघड्यावर मद्यपान होत आहे. परिणामी लॉकडाऊनमध्ये नियंत्रणात आलेली गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढू लागली आहे. अशाच प्रकारातून गत महिन्यात कामोठे येथे ढाब्यावर गोळीबाराची घटना घडली, तर नेरुळ येथे बारच्या छतावर पार्टीत हाणामारीची घटना घडली; परंतु उघडपणे बार, मद्यविक्रीच्या ठिकाणी नियमांची पायमल्ली होत असतानाही उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
मद्यविक्री केंद्रांबाहेर गर्दी
मद्यविक्री केंद्रांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत गर्दी होत आहे. त्यांच्याकडून रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत. वाहतुकीला अडथळा होऊन यामुळे अपघात घडत आहेत.
उघड्यावरच मद्यपान
शहरातील बहुतांश मद्यविक्री केंद्रांच्या आवारात उघड्यावर मद्यपान केले जात आहे. त्यापैकी बहुतांश ठिकाणे मुख्य रस्त्यालगतची असतानाही होत नसलेल्या कारवाईचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
बार ठरतात डोकेदुखी
नवी मुंबईसह पनवेलमध्ये अनेक ठिकाणी मद्यरात्रीपर्यंत बार सुरू राहत आहेत. यामुळे त्याठिकाणी ये-जा करणाऱ्या तळीराम व गुन्हेगारांमुळे परिसरातील नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे.