लोकमत इम्पॅक्ट: दीडशे कोटींच्या 'काक' घोटाळ्याची चौकशी ईओडब्ल्यू करणार
By गजानन जानभोर | Published: February 23, 2022 01:02 PM2022-02-23T13:02:12+5:302022-02-23T13:02:12+5:30
सहपोलीस आयुक्तांकडून दुजोरा, दोन लाखाहून अधिक लोकांची फसवणूक
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: बोरिवलीतील काक इकॉनॉमिक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक किशोर काकडे याने ऐन लॉकडाऊनमध्ये विविध योजनांच्या नावाखाली शहरांसह गावखेड्यातील गरिबांकडून पैसे उकळले. आता हा फसवणुकीचा आकडा हा दीडशे कोटींच्या घरात गेला आहे. सदर प्रकरण सर्वप्रथम 'लोकमत' ने उघडकीस आणले. ज्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
बोरिवली पोलिसांनी काकडेच्या काक इकॉनॉमिक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कार्यालयात जेव्हा धाड टाकली तेव्हा तेथील संगणक, सर्व्हर तसेच क्लाउड सर्व्हरवरील सर्व डेटा जप्त करण्यात आला. ही माहिती खंगाळत असताना गुंतवणूकदारांच्या यादीत २ लाखांहून अधिक लोकांची नावे उघड होऊन आकडा १५० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या फसवणूकीची बातमी 'लोकमत' ने 'गरिबांची अशीही फसवणूक, पाच हजारात वर्षभर किराणा' या मथळ्याखाली २० फेब्रुवारी, २०२२ रोजी प्रकाशित केली. त्यानुसार सोमवारी याप्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून घेत तपास आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्याचा निर्णय घेतला.
मंगळवारी बोरिवली पोलिसांनी तपासाची संबंधित कागदपत्रे ईओडब्ल्यूकडे सोपवली. याप्रकरणी ईओडब्ल्यूचे सह पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना लोकमत प्रतिनिधीने संपर्क केला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गरीब, रोजंदारीवर असलेल्या मजूरांनी कंपनीत दोन वेळेचा किराणा मिळण्याच्या आशेने ही गुंतवणूक केली होती. त्यामुळे त्याची सखोल चौकशी झाल्यास फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यानी वर्तवली आहे.
'सिक्रेट रेड' आणि सापडले पुरावे !
आरोपी काकडे हा राजकीय पोच असलेला व्यक्ती असल्याने बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने अत्यंत गुप्त पद्धतीने 'काक' कार्यालयात धाड टाकली. अन्यथा पुरावा असलेला डेटा डिलीट करून तो फरार होण्याची शक्यता होती. त्याच्या उपस्थितितच फसव्या कंपनीचे सर्व रेकॉर्ड जप्त करत त्याच्या मुसक्या अवळण्यात आल्या.
आरोपीशी 'सेटलमेंट' आणि...
गेल्या दोन वर्षात बोरिवली पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी आलेल्या लोकांचा उद्देश काकडेशी सेटलमेंट करण्याचा होता. त्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यास कोणीच पुढे आले नाही आणि परिणामी घोटाळ्याचा हा वणवा पसरतच गेल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.