लोकमत इम्पॅक्ट : नागपूरच्या बांगलादेश येथील जुगार अड्डयावर छापा , १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:42 PM2020-02-28T22:42:58+5:302020-02-28T22:43:31+5:30

गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास कोलकाता रेल्वे लाईनला लागून असलेल्या बांगलादेश, खैरीपुरा येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्डयावर पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे छापा मारण्यात आला.

Lokmat Impact: Raid on gambling den in Bangladesh, Nagpur | लोकमत इम्पॅक्ट : नागपूरच्या बांगलादेश येथील जुगार अड्डयावर छापा , १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत इम्पॅक्ट : नागपूरच्या बांगलादेश येथील जुगार अड्डयावर छापा , १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देअड्डा संचालक फरार, दोघे पोलिसांच्या तावडीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास कोलकाता रेल्वे लाईनला लागून असलेल्या बांगलादेश, खैरीपुरा येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्डयावर पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे छापा मारण्यात आला. या कारवाई लक्झरी कार, शस्त्र आणि इतर साहित्य असे १२ लाख २३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी छापा मारला तेव्हा या अड्डयाचे मुख्य संचालक किशोर ऊर्फ बाल्या बिनेकर व भोजराज ऊर्फ बंडू सोनकुसरे घटनास्थळावरून फरार झाले असून, नालसाह चौक निवासी अय्याज फैय्याज मोहम्मद (४०) व नाईक तलाव निवासी नरेश गोपालराव गाते (३२) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या जागेवर मोठ्या प्रमाणात अवैध जुगार, कोंबड्यांची लढाई व अवैध दारू विक्र चालत असल्याची बातमी ‘लोकमत’ने २५ फेब्रुवारीला प्रकाशित केली होती. बातमीची दखल घेत गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांनी बुधवारी लागलिच कारवाई केली. मात्र, कोलकाता रेल्वे लाईनला लागून असलेल्या पाचपावली फाटक ते कावरापेठ दरम्यान सगळे जुगार अड्डे बंद दिसून आले. दरम्यान, लकडगंज येथील जुनी मंगळवारीमध्ये कोंबड्यांची लढाई लावण्यात येणाऱ्या अड्डयांवर छापे मारण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट तीनला गुरुवारी बांगलादेश नाल्याच्या शेजारी बाल्यातर्फे संचालित जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच गुरुवारी पुन्हा एकदा छापेमार कारवाई करण्यात आली. मात्र, मोकळ्या मैदानाचा लाभ घेत बाल्या व भोजराज पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनास्थळावरून पत्ते, सहा हजार रुपये रोख, बाल्याची कार, १५ हजार रुपयाचे मोबाईल आणि चाकू जप्त करण्यात आले. सर्व आरोपींविरूद्ध जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्त्वातील या कारवाईत एपीआय पंकज धाडगे, हवालदार रामचंद्र कारेमोरे, अरुण धर्मे, अनुप शाहू, टप्पूलाल चुटे, अमीत पात्रे यांनी केली.

आतल्या भेदीमुळे बाल्या नेहमीच होतो फरार
बाल्या बांगला देश नाल्याच्या शेजारी असलेल्या इमारतीत हा अड्डा चालवित होता. यापूर्वीही त्याच्या या धंद्याबाबत तक्रारी झाल्या आहेत. मात्र, त्याच्यावर कारवाई कमीच झाली आहे. जेव्हा जेव्हा छापे टाकण्यात आले तेव्हा तेव्हा तो अलगद पळून गेल्याचे सांगण्यात येते. पोलिसांमध्येच कुणीतरी आतला भेदी असल्यामुळेच, तो कधीच सापडत नसल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या सर्वच गाड्यांचे क्रमांक २०० असून, तो कुटुंबीयांसोबत अत्यंत पॉश भागात राहातो. त्याच्यावर गँगस्टर संतोष आंबेकरच्या धर्तीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Lokmat Impact: Raid on gambling den in Bangladesh, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.