इंस्टाग्रामवरील लंडन डॉक्टर मित्र निघाला ठग, तरुणीला ८ लाख रुपयांचा बुर्दंड
By मनीषा म्हात्रे | Published: September 12, 2022 08:33 PM2022-09-12T20:33:41+5:302022-09-12T20:34:29+5:30
दहिसर येथील रहिवासी असलेले २२ वर्षीय रेश्मा (नावात बदल ) या एका नामांकित कंपनीत नोकरीला आहे. ५ ऑगस्ट रोजी त्यांना एका तरुणाच्या नावाने रिक्वेस्ट आली
मुंबई : इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या लंडनच्या डॉक्टरने पाठवलेल्या गिफ्टसाठी तरुणीला तब्बल सव्वा आठ लाख रुपये मोजावे लागल्याची घटना दहिसरमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
दहिसर येथील रहिवासी असलेले २२ वर्षीय रेश्मा (नावात बदल ) या एका नामांकित कंपनीत नोकरीला आहे. ५ ऑगस्ट रोजी त्यांना एका तरुणाच्या नावाने रिक्वेस्ट आली. त्यांनी, रिक्वेस्ट स्वीकारत संवाद साधण्यास सुरुवात केली. तरुणाने तो लंडन येथे इमरजन्सी सर्जन डक्टर असल्याचे सांगितले. संवाद वाढल्याने एकमेकांचे व्हॉट्सअप क्रमांक शेअर केले. मैत्री वाढली. तरुणाने गिफ्ट पाठवत असल्याचे सांगून विश्वास संपादन करण्यासाठी व्हॉट्सअँपवर रिसिप्ट पाठवली. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी दिल्ली विमानतळावरून कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगून अनोळखी व्यक्तीने कॉल केला. गिफ्टसाठी विविध कारणे पुढे करत पैसे काढण्यास सुरुवात झाली. तरुणींकडून तब्बल सव्वा आठ लाख रुपये उकळण्यात आले. तरीही पैशांची मागणी सुरु असल्याने तरुणीला संशय आला. मोठी रक्कम गमावल्यामुळे भीतीने तिने कुणालाही काही सांगितले नाही. अखेर, यात फसवणूक झाल्याची खात्री पटताच तिने भावाकडे याबाबत सांगितले. भावाच्या मदतीने रविवारी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला.