मालमत्तेसाठी केअरटेकरने केली एकाकी ज्येष्ठाची हत्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 05:46 AM2021-12-18T05:46:12+5:302021-12-18T05:46:40+5:30

४४ वर्षांच्या महिलेने केले ७७ वयाच्या वृद्धाशी लग्न; मृत्यूचे वृत्त कळताच मुलगी पाेहाेचली थेट स्मशानभूमीत

Lonely elder killed by caretaker for property 44 year old woman married 77 ola man | मालमत्तेसाठी केअरटेकरने केली एकाकी ज्येष्ठाची हत्या?

मालमत्तेसाठी केअरटेकरने केली एकाकी ज्येष्ठाची हत्या?

Next

मनीषा म्हात्रे
मुंबई : आईच्या निधनानंतर वडिलांच्या देखभालीसाठी ४० वर्षीय महिलेला केअरटेकर म्हणून नेमले खरे, मात्र त्या महिलेने ७७ वर्षीय येझदीयगर एडलबहेराम यांच्याशी आधी लग्न केले. नंतर त्यांचे निधन झाले असे सांगून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेले. वडिलांंच्या निधनाचा फोन आला तेव्हा त्यांची मुलगी नताशाने स्मशानभूमी गाठली असता केअरटेकर महिला पसार झाली. आपल्या वडिलांची हत्या झाल्याचे सांगत नताशाने पोलीस ठाणे गाठले आणि हा प्रकार समोर आला. माटुंग्यात घडलेल्या या प्रकारामुळे मुंबईत एकटे राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. 

अंधेरीतील नताशा सेथना (४४) यांनी केलेल्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी केअरटेकर महिलेविरुद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. नताशा यांनी आईच्या निधनानंतर वडिलांच्या देखभालीसाठी मंगल कल्याण गायकवाड (४०) नावाच्या महिलेला कामावर ठेवले. ती २०१६ पासून वडिलांसोबत घरातच राहात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून मंगलने कॉल घेणे बंद केले. वडीलही फोन उचलत नव्हते. १० ऑक्टोबर रोजी आत्याच्या मुलाने कॉल करून वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. नताशा यांनी फॅमिली डॉक्टरला कॉल करून चौकशी केली असता वडिलांचे सकाळीच निधन झाल्याचे तिला सांगण्यात आले. निधनाची बातमी ऐकून नताशा यांना धक्का बसला.

केअरटेकर मंगल वडिलांचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत गेल्याचे समजताच नताशांनी स्मशानभूमी गाठली. वडिलांच्या निधनाबाबत आपल्याला का कळवले नाही, अशी विचारणा करताच मंगलने मृतदेह तेथेच सोडून पळ काढला. वडिलांच्या कपाळावरही जखमा दिसत होत्या. संशय आल्याने नताशांनी मंगलने स्मशानभूमीत जमा केलेली कागदपत्रे तपासली. त्यात डॉ. अनिल नांदोस्कर यांनी दिलेल्या नैसर्गिक मृत्यूच्या प्रमाणपत्रासह माटुंगा पोलीस ठाण्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दिलेल्या प्रमाणपत्राचा समावेश होता. त्यामुळे संशय न घेता नताशांनी अंत्यविधी पार पाडले. अंत्यविधीनंतर मंगलने जमा केलेली सर्व कागदपत्रे नताशांनी पाहिली. त्यात वडील आणि मंगल यांच्या लग्नाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत आणि मंगलचे आधारकार्ड होते. वडिलांनी या लग्नाबाबत नताशाला काहीच सांगितले नव्हते. 

त्यानंतर, नताशा यांनी मंगलला जाब विचारण्यासाठी वडिलांचे घर गाठले तेव्हा मंगलने नताशाला शिवीगाळ करत घरातून हाकलून दिले. वडिलांची मालमत्ता बळकावण्यासाठी वडिलांशी लग्नाचा घाट घालून त्यांची हत्या केल्याचा संशय नताशाने तक्रारीत केला आहे. माटुंगा पोलीस अधिक तपास करत आहेत.

वडील म्हणत होते मंगल नसताना भेट 
वडील अनेकदा कॉल करून मंगल नसताना भेटण्यास सांगत होते. मंगल मात्र वडिलांच्या आजारपणाचे कारण पुढे करत कोणाला भेटू देत नव्हती. त्यामुळे वडील दडपणाखाली होते. वडिलांची संपत्ती, दागिने, घर हडपण्यासाठी मंगलने लग्नाचा घाट घातल्याचा संशय नताशाने वर्तवला आहे. 

पैसे नाही म्हणत वडिलांना रुग्णालयातही नेले नाही...
नताशा व तिच्या कुटुंबीयांनी फॅमिली डॉक्टरकडे चौकशी केली असता ५ तारखेला वडिलांना तपासण्यासाठी घरी आलेल्या डॉक्टरांंना वडील जखमी दिसले. वडील घरातील बाथरुमध्ये पाय घसरुन पडल्याने त्यांच्या छातीला व डोक्याला दुखापत झाली होती, असे मंगलने डॉक्टरना सांगितले. तेव्हा त्यांनी खाजगी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. मात्र मंगलने पैसे नसल्याचे कुठल्याही दवाखान्यात नेले नाही.

हत्या की निष्काळजीपणा...
८ तारखेला मंगल वडिलांचा मृतदेह केईएम रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरांनी येझदीयगर एडलबहेराम यांना दाखलपूर्व मयत घोषित करुन मृतदेह पुढील चौकशीसाठी केईएम रुग्णालयातील पोलीस अंमलदाराच्या ताब्यात दिला होता. पोलिसांनी ही माहिती माटुंगा पोलीसांना दिली. परंतु मंगल व कृष्णा यांनी त्यांच्या ओळखीच्या खाजगी डॉक्टरद्वारे आर्थिक देवाणघेवाण करुन अयोग्य पद्धतीने थेट नैसर्गिक मृत्यू झाल्याचे मृत्यू प्रमाणपत्र  मिळवून पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

मंगलचे याआधीही दोन लग्न 

  • मंगलचे पहिले लग्न कल्याण गायकवाड या इसमासोबत झाले, नंतर त्यांचा घटस्फोट झाला. कल्याणपासून मंगलला कृष्णा नावाचा मुलगा आहे. मंगलचे दुसरे लग्न टॅक्सीचालक राजेश शर्मा याच्यासोबत झाले. 
  • त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. राजेशपासून मंगलला यश हा मुलगा असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.


दोघांच्या लग्नाचे प्रमाणपत्र मिळाले असून, महिलेने वृद्धाच्या उपचारात निष्काळजीपणा दाखवल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरु आहे.
- विजय पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४

हजारो एकाकी वृद्धांचे काय?

  • मुंबईत हजारो एकाकी वृद्ध राहतात. त्यांची मुले केअरटेकर ठेवतात. अनेक ठिकाणी तर तीही व्यवस्था नाही. पोलीसच अशा वृद्धांना जेवण, औषधे पुरवत असतात.
  • या घटनेमुळे अशा वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. यांची जबाबदारी कोण घेणार आणि अशा घटनांपासून यांचे जीव कोण वाचवणार याचे उत्तर कोणीही देत नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते आम्हाला शंभर शब्दांपर्यंत लिहून ९५९४०५७४५५ या नंबरवर आपल्या नावासह व्हॉट्सॲपवर पाठवा.

Web Title: Lonely elder killed by caretaker for property 44 year old woman married 77 ola man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.