सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 01:13 PM2024-11-26T13:13:54+5:302024-11-26T13:15:14+5:30

महिलेला डिजिटल अरेस्ट करून ३.८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

longest digital arrest in mumbai whatsapp call looted 3 crores | सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

मुंबईत एका बनावट पोलिसाने ७७ वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्ट करून ३.८ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. दक्षिण मुंबईतील महिलेला महिनाभर डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. महिलेला सांगण्यात आलं की, तिला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली जाऊ शकते. आरोपींनी धमकी देऊन ३.८ कोटी रुपयांची फसवणूक केली. TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही महिला तिच्या ७५ वर्षीय पतीसोबत राहते. मुलं परदेशात राहतात.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला व्हॉट्सॲप कॉल आला होता. ज्यामध्ये तैवानला पाठवलेलं त्यांच्या नावाचं पार्सल पकडण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. पार्सलमध्ये ५ पासपोर्ट, बँक कार्ड, ४ किलो कपडे आणि औषधं आहेत. महिलेने फोन करणाऱ्याला स्पष्टपणे सांगितलं की, तिने कोणतंही पार्सल पाठवलेलं नाही. कॉलरने आधार कार्डचे तपशील तिचेच असल्याचं सांगितलं आणि हा कॉल एका बनावट मुंबई पोलीस अधिकाऱ्याला ट्रान्सफर करण्यात आला. महिलेला सांगण्यात आलं की, तिचं आधार कार्ड मनी लाँड्रिंगशी लिंक करण्यात आलं आहे.

महिलेला स्काय एप डाऊनलोड करा असं सांगण्यात आलं. याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी महिलेला देण्यात आली. कॉलरने आयपीएस आनंद राणा आणि वित्त विभागाचे अधिकारी जॉर्ज मॅथ्यू असं नाव सांगितलं. अकाऊंट नंबर दिला आणि पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं. चौकशीसाठी हे करत असल्याचं म्हटलं. ही महिला इतकी घाबरली की तिला २४ तास व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलवर राहण्यास सांगण्यात आलं. महिलेची फसवणूक झाली. 

घरच्या कॉम्प्युटरवर महिनाभर व्हिडीओ कॉल सुरू ठेवण्यात आला होता. जेव्हा जेव्हा कॉल डिस्कनेक्ट झाला तेव्हा तो महिलेला त्वरित व्हिडीओ कॉल चालू करण्यास सांगायचा आणि लोकेशन सतत चेक करायचा. आरोपींनी महिलेला तिचे सर्व पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. तसेच ते चौकशीनंतर परत करू असं म्हटलं. त्यातील १५ लाख रुपये आरोपींनी परत केले आणि महिलेचा विश्वास जिंकला. यानंतर तिला पतीच्या अकाऊंटमधून पैसे ट्रान्सफर करण्यासही सांगण्यात आले. महिलेने सहा बँक खात्यांतून ३.८ कोटी रुपये ट्रान्सफर केले.

यावेळी आरोपींनी पैसे परत न केल्याने महिलेला संशय आला. याच दरम्यान, आरोपी सतत आणखी पैशांची मागणी करत होते. महिलेने आपल्या मुलीला बोलावून संपूर्ण हकीकत सांगितली. मुलीने पोलिसांची मदत घेण्यास सांगितलं. महिलेने कॉल करून संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 

Web Title: longest digital arrest in mumbai whatsapp call looted 3 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.