अबब... ९०० कोटींची लूट; महाराष्ट्र बनले सायबर भामट्यांचे हब
By मनीषा म्हात्रे | Published: June 11, 2023 10:05 AM2023-06-11T10:05:02+5:302023-06-11T10:05:25+5:30
सायबर गुन्हेगारीचे हे संकट दिवसेंदिवस वाढत असताना यावर नियंत्रण आणण्याचे एक मोठे आव्हान सायबर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
मनीषा म्हात्रे, वरिष्ठ प्रतिनिधी
आभासी जग तयार करून पडद्यामागून नागरिकांच्या बँक खात्यातील ठेवींवर हात साफ करणाऱ्या सायबर भामट्यांनी गेल्या अडीच वर्षांत राज्याची ९०० कोटींहून अधिक रक्कम लुटली आहे. सायबर गुन्हेगारीचे हे संकट दिवसेंदिवस वाढत असताना यावर नियंत्रण आणण्याचे एक मोठे आव्हान सायबर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
मनुष्यबळाचा अभाव...
सायबर संकट वाढत असताना सायबर विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे पर्यायी होम गार्डच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत कारवाई करणे सुरू आहे.
हेल्पलाइनमुळे वाचले १.९३ कोटी
सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाइनमुळे २० मे ते आतापर्यंत १ कोटी ९३ लाख ४३ हजार वाचविण्यात यश आले आहे.
टॉप ५ गुन्हे
फिशिंग कॉल, एसएमएस लिंक, तसेच बक्षिसासह विविध आमिषाच्या नावाखाली फसवणुकीचे ५४१ गुन्हे नोंद आहेत. गेल्या वर्षी हाच आकडा १ हजार १२१ होता. या गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांत राज्यभरात १८ कोटी ७ लाख, १५ हजार, ६२० रुपयांवर सायबर भामट्याने डल्ला मारला आहे.
डेबिट/क्रेडिट कार्ड, एटीएम फसवणुकीच्या गुन्ह्यात सर्वाधिक फसवणुकीच्या घटना घडलेल्या आहे. गेल्या चार महिन्यांत राज्यभरात ३३० गुन्हे नोंद असून, त्यापैकी १४ गुन्हे उघडकीस आणले असून, २७ जणांना अटक करण्यात आली आहे.
सायबर फसवणुकीचे शिकार होताच तत्काळ सायबर पोलिसांच्या संकेतस्थळावर तक्रार करा. तेथे तक्रार जाताच तत्काळ संबंधित बँकेला त्याचा अलर्ट मिळतो. त्यानुसार, बँक अधिकारी संबंधित खाते गोठवतात. तसेच, १९३० या हेल्पलाइनवर कॉल केल्यास तक्रार नोंदवून घेतली जाते. तीन तासांच्या आत तक्रार केल्यास रक्कम वाचविण्यास मदत होते. नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. - संजय शिंत्रे, पोलिस अधीक्षक, सायबर गुन्हे