अमेरिकेतील रहिवाशांना लुटणारे रॅकेट उध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 04:23 PM2019-09-20T16:23:49+5:302019-09-20T16:25:58+5:30
गुन्हे शाखेची कारवाई : सानपाडा येथे भाडोत्री जागेत चालायचे कॉलसेंटर
नवी मुंबई - इंटरनेटद्वारे अमेरिकेतील रहिवाशांना कॉल करुन खोटय़ा गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून लुटणारे रॅकेट उघड झाले आहे. त्यांच्याकडून सानपाडा येथे भाडोत्री जागेत अनेक दिवसांपासून कॉलसेंटर चालवले जात होते. याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने त्याठिकाणी छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. त्यापैकी एकाने यापूर्वी कॉलसेंटरमध्ये काम केले असल्याने त्याच्याकडे अमेरिकेतील नागकिरांचे फोन नंबर होते.
सानपाडा सेक्टर 11 येथील एलोरा फिस्टा टॉवरमध्ये भाडोत्री जागेत कॉन्सीअर्ज हेल्प केअर सोल्युशन सव्र्हिसेस नावाने हे कॉलसेंटर चालवले जात होते. ट्रॉम्बे येथे राहणारया मन्सुर अली कासीम शेख (29) याच्याकडून हे कॉलसेंटर चालवले जात होते. त्याठिकाणावरुन इंटरनेटद्वारे अमेरिकेतील रहिवाशांना फोन करुन त्यांच्या संगणक अथवा लॅपटॉपमध्ये वायरस असल्याची माहिती दिली जायची. त्यानंतर तो वायरस काढण्याच्या बहाण्याने संगणकाचा रिमोट ऍक्सेस स्वत: कडे घेतला जायचा. त्यानंतर संगणकातील महत्वाची माहिती मिळवून त्या व्यक्तीचा अमली पदार्थाच्या तस्करीशी संबंध असल्याचे सांगितले जायचे. त्यानंतर संभाव्य कारवाईची भीती दाखवून खोटय़ा गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जायची. हि कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम उकलळी जात होती.या बनावट कॉलसेंटरची माहिती गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक राणी काळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त संजय कुमार, गुन्हे शाखा उपआयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरिक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला असता, या बनावट कॉलसेंटरचा भांडाफोड झाला. याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मन्सुर शेख याच्यासह मोहम्मद साजीद मोहम्मद जुनेद शेख (29), मोहम्मद जहिर साईमोहम्मद शेख (32), मोहम्मद फरहान मोहम्मद तसदिक शेख (28) व मुतरुझा अख्तर मोटारवाला (30) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी आजवर किती जणांना लुटले आहे, याचा निश्चित आकडा उघड झालेला नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.