मुलुंडमध्ये कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप केला लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 07:33 PM2019-03-30T19:33:06+5:302019-03-30T19:34:39+5:30
याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई - मुलुंड पश्चिम येथील प्लॅटिनम रुग्णालयासमोर मुलुंड चेक नाक्याजवळ पार्क केलेल्या चारचाकी वाहनांची काच फोडून चोरटयांनी लॅपटॉप लंपास केला आहे. ही घटना काल रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काल तक्रारदार दिनेश शेट्टीगार हे मुलुंड चेक नाक्याजवळील कोहिनूर येथे काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, दिनेश यांनी त्यांची ग्रँड आय १० (एमएच ०३; सीएस ३०२८) ही चारचाकी गाडी त्यांनी प्लॅटिनम रुग्णालयासमोर पार्क केली होती. त्यावेळी अवघ्या ५ ते ७ मिनिटात गाडीजवळ येईपर्यंत कारची पुढील डावीकडील काच फोडून चोरट्यांनी दिनेश यांची कारमध्ये मागच्या सीटवर ठेवलेली लॅपटॉपची बॅग लंपास केली होती. ५ ते ७ मिनिटात दिनेश यांनी गाडीची काच फोडलेली आणि बॅग लंपास केलेली पाहून मुलुंड पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. मुलुंड पोलीस ठाण्यात याबाबत भा. दं. वि. कलम ३७९ आणि ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी सरदेसाई यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, घटनास्थळावरील काही सीसीटीव्ही तपासले असून अभिलेखावरील गुन्हेगारांचा तपास करत आहोत.
मुलुंड पश्चिम येथील प्लॅटिनम रुग्णालयासमोर मुलुंड चेक नाक्याजवळ पार्क केलेल्या चारचाकी वाहनांची काच फोडून चोरटयांनी लॅपटॉप लंपास केला आहे. ही घटना काल रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 30, 2019