1 रुपयाच्या नाण्याच्या बदल्यात मोठी फसवणूक; 26 लाख रुपये गमावल्याने व्यावसायिकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 07:45 PM2022-05-06T19:45:35+5:302022-05-06T20:10:24+5:30
Crime News : कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरूपासून 60 किमी दूर असलेल्या चिक्कबल्लापुरा येथील आहे.
बंगळुरू : कर्नाटकात 1 रुपयाच्या जुन्या नाण्याच्या बदल्यात एका व्यावसायिकाची 56 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. यानंतर या व्यावसायिकाकडून 26 लाख रुपये उकळण्यात आले. या फसवणुकीने दुखावलेल्या व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली.
कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरूपासून 60 किमी दूर असलेल्या चिक्कबल्लापुरा येथील आहे. अरविंद नावाच्या एका छोट्या व्यावसायिकाकडे 6 दशकापूर्वीचे जुने 1957 चे 1 रुपयाचे नाणे होते. जुन्या नाण्यांच्या ऑनलाईन लिलावात चांगले पैसे मिळतात असे त्यांनी ऐकले होते. त्यामुळे ऑनलाइन लिलावासाठी (Online Auction) त्यांनी आपली नाणीही कोणत्यातरी वेबसाइटवर टाकली. यादरम्यान ते फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकले.
दरम्यान, अरविंद यांचे चिक्कबल्लापुरा येथे गिफ्ट शॉप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणार्याने अरविंदशी फोनवरून संपर्क साधला आणि नाणे खरेदी करण्यात रस दाखवला. त्याने अरविंदला नाण्याचे चित्र पाठवायला सांगितले. त्यानंतर त्याने सांगितले की, या नाण्याच्या बदल्यात 56 लाख रुपये देऊ शकतो. अरविंद यांनी हे मान्य केल्यावर त्यांच्याकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली काही खात्यात 2 हजार जमा केले. त्यानंतर वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली पैसे मागत राहिले. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्याने 26 लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर एके दिवशी त्याचा फोन बंद आला.
फसवणूक करणाऱ्याला पैसे देण्यासाठी अरविंदने पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते. मित्रांकडून कर्जही घेतले. मात्र, याबाबत अरविंद यांनी आपल्या पत्नीला काहीच सांगितले नव्हते. त्यामुळे या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का सहन झाली नाही. तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा अरविंद यांना वाटले की आपल्याजवळ काहीच उरले नाही, तेव्हा त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
अरविंद हे शहराबाहेर एका निर्जन ठिकाणी पोहोचले. तेथे त्यांनी आपली स्कूटर एका मंदिराजवळ उभी केली. त्यानंतर स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. यापूर्वी त्यांनी आपल्या मित्राला व्हॉट्सअॅप मेसेजही पाठवला होता. मात्र त्यांच्या मित्रांना व्यस्ततेमुळे रात्री मेसेज पाहता आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अरविंद यांचे निधन झाले होते.