शेअरमार्केटमध्ये बुडाला अन् घरफोडीचा ‘ट्रॅक’ धरला; आठवडाभरात गुन्ह्याचा छडा

By अझहर शेख | Published: July 19, 2022 06:25 PM2022-07-19T18:25:18+5:302022-07-19T18:25:54+5:30

Crime News : गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने नाशिक रोडमधील दोघा संशयित तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत.

loss in the share market and caught the 'track' of burglary; A crime spree within a week in nashik | शेअरमार्केटमध्ये बुडाला अन् घरफोडीचा ‘ट्रॅक’ धरला; आठवडाभरात गुन्ह्याचा छडा

शेअरमार्केटमध्ये बुडाला अन् घरफोडीचा ‘ट्रॅक’ धरला; आठवडाभरात गुन्ह्याचा छडा

Next

नाशिक : शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करत, आर्थिक कमाई करताना झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एका उच्चशिक्षिताने आपल्या दुसऱ्या मित्राला सोबत घेत, चक्क घरफोडी करण्याचा ‘ट्रॅक’ धरल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने नाशिक रोडमधील दोघा संशयित तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी आठवडाभरापूर्वी जयभवानी रोडवरील एका बंगल्यात घरफोडी करत २१ लाख ६८ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे हिरेजडीत दागिने, रोकड लांबविली होती.

‘ईश्वर’ बंगला बंद असताना, चोरट्यांनी लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला होता. तिजोरीतील सोन्या-चांदीचे हिरेजडीत दागिन्यांसह रोकड घेऊन चोरटे चारचाकी मोटारीतून फरार झाले होते. या प्रकरणी संजय ईश्वरलाल बोरा यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांच्या नियंत्रणाखाली गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाकडून केला जात होता. हवालदार प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून वाघ यांनी त्वरित उपनिरीक्षक पोपट कारवाळ, शंकर काळे, गुलाब सोनार, प्रकाश काळे, देवकिसन गायकर आदींच्या पथकाला सज्ज करत मोटवानी रोड गाठले.

गोपनीय माहितीप्रमाणे, संशयास्पद ‘रिट्स’ कार आली असता, पोलीस वाहन त्या कारपुढे आणून पथकाने कार रोखली. यावेळी कारमध्ये असलेल्या दोघांनी रोहन संजय भोळे (३५, रा.विद्यानगर, ना.रोड), ऋषिकेश मधुकर काळे (२६,रा.गंधर्वनगरी, ना.रोड) अशी ओळख सांगितली. दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पथकाने त्यांना संशयावरून ताब्यात घेतले. संशयित रोहन हा शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करत होता. त्यामध्ये त्याला तोटा झाला. त्यानंतर, तो सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वी गुन्हेगारीकडे वळाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघा संशयितांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.१९) पोलीस कोठडी सुनावली.

दोन कार, दुचाकी जप्त
संशयित रोहन व ऋषिकेश चांगल्या सुशिक्षित कुटुंबातील आहेत. १० जुलै रोजी त्यांनी ईश्वर बंगल्यात घरफोडी केली. त्यापूर्वी मे महिन्यात जयभवानी रोडवरील अजून एक घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यातील कार (एम.एच.०३ बीई०८४८), मारुती स्विफ्ट (एम.एच१५ जीएल ९१४२) ॲक्सेस दुचाकी (एम.एच१५ ईबी३०३३) दोन मोबाइल जप्त केले आहेत.

घरफोडी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर क्राइम सीन उभा केला गेला. यावेळी ‘गेट ॲनालिसिस’द्वारे या दोघांची देहबोली, चालण्याची ढब आणि बंगल्यात घरफोडी करताना, सीसीटीव्हीत कैद झालेले चोरट्यांची हालचाल पडताळून बघितली गेली. ती एकसमान आढळून आली. या दोघा संशयितांनी जीममध्ये जाऊन कमाविलेल्या बलवान शरीराचा चुकीच्या पद्धतीने गैरकामासाठी वापर केला, हे दुर्दैव.
- जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त.

Web Title: loss in the share market and caught the 'track' of burglary; A crime spree within a week in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.