अनोळखी लिंकवर क्लिक करताच गमावले १ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 02:46 AM2019-06-06T02:46:17+5:302019-06-06T02:46:27+5:30
दादर परिसरात अनुपम रवींद्रनाथ पारकर (३६) हे कुटुंबीयांसोबत राहतात. ते जनरल इन्शुरन्समध्ये नोकरी करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे क्रेडिट कार्ड बहिणीकडे होते.
मुंबई : मोबाइलवर आलेल्या लिंकमुळे दादरमधील एका व्यक्तीने १ लाख गमावल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस अधिक तपास करत आहेत.
दादर परिसरात अनुपम रवींद्रनाथ पारकर (३६) हे कुटुंबीयांसोबत राहतात. ते जनरल इन्शुरन्समध्ये नोकरी करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे क्रेडिट कार्ड बहिणीकडे होते. मात्र, त्याबाबतच्या व्यवहाराचे संदेश त्यांच्या मोबाइलवर येत असत. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पारकर यांच्या मोबाइलवर एका अनोळखी नंबरवरून संदेश आला. त्यात एक लिंक पाठविण्यात आली. त्यात त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती भरायची होती. त्यानंतर, त्यांना एका नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने तुम्ही क्रेडिट कार्डवरून काही व्यवहार केले आहेत का, अशी विचारणा केली, तसेच या संदर्भात लिंकवर दिलेली माहिती भरा, ती न भरल्यास तुमचे कार्ड ब्लॉक होऊ शकते, असे सांगितले. त्यांचा कॉल करणाºया व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने त्यांनी सर्व माहिती भरून पाठविली. त्यानंतर, पारकर यांच्या मोबाइलवर क्रेडिट कार्डवरून व्यवहार झाल्याचे १० ते १२ संदेश धडकले. यात एकूण ५० हजारांचे ४ व्यवहार झाले होते. यातील दोन व्यवहारच पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या खात्यातून एकूण १ लाख रुपये गेले.