प्रेम, विश्वासघात अन् हत्या..! ५ वर्षांनी न्यूज अँकरच्या हत्येचं रहस्य उलगडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 07:55 PM2023-08-24T19:55:22+5:302023-08-24T19:55:50+5:30

आयपीएस अधिकारी रॉबिन्सन यांनी या केसशी निगडीत सगळ्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले.

Love, betrayal and murder..! After 5 years, the mystery of news anchor's Salma Sultana murder was revealed | प्रेम, विश्वासघात अन् हत्या..! ५ वर्षांनी न्यूज अँकरच्या हत्येचं रहस्य उलगडलं

प्रेम, विश्वासघात अन् हत्या..! ५ वर्षांनी न्यूज अँकरच्या हत्येचं रहस्य उलगडलं

googlenewsNext

गुन्हेगारीच्या काळ्या जगतात कित्येक हत्येच्या घटना दरवर्षी समोर येत असतात. परंतु काही घटना अशा असतात ज्या मर्डर मिस्ट्री बनतात. अशा घटनांचा शोध घेणे अन् खऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळणे पोलिसांसमोर आव्हान असते. गुन्हेगार हा पोलिसाच्या पुढचा विचार करत असतो. त्यामुळे त्याच्याशोधात पोलिसांना पाठलाग करावा लागतो. परंतु हे गुन्हेगार कितीही हुशारी दाखवत असले तरी एक ना एक दिवस कायद्याच्या कचाट्यात अडकतात. कारण कायद्याने कुठलाही गुन्हेगार वाचू शकत नाही. ही कहाणी आहे छत्तीसगडच्या कोरबा येथील न्यूज एंकर सलमा सुल्तानाची...

कोण होती सलमा सुल्ताना?

कोरबाच्या कुसमुंडा भागात राहणारी १८ वर्षीय सलमा सुल्ताना एका सामान्य कुटुंबातून येत होती. ती सुंदर होती त्यासोबत टॅलेंटेड होती. १० वीच्या परीक्षेनंतर २०१६ मध्ये ती टीव्ही पत्रकारितेत आली. स्क्रीनवर ती दिसू लागली आणि खूप कमी वयात तिने टिव्ही जगतात स्वत:ची नवी ओळख निर्माण केली. तिने अँकरिंगसोबत रिपोर्टिंग, स्टेज शो आणि अन्य कार्यक्रमात भाग घेतला. एका मोठ्या टीव्ही चॅनेलचे अँकर होण्याचे तिचे स्वप्न होते. परंतु तिचे हे स्वप्न अपूर्ण राहील याची कल्पनाही तिने केली नव्हती.

२०१८ मध्ये सलमा झाली बेपत्ता

सलमाच्या आयुष्यात सर्वकाही सुरळीत सुरू होते. पण ऑक्टोबर २०१८ चा तो दिवस उजडला, सलमा रोजप्रमाणे कामावर जाण्यासाठी कुसमुंडाहून कोरबा येथे निघाली. परंतु दिवस सरला तरी ती घरी परतली नाही. त्यानंतर कुटुंबाने तिचा शोध घेणे सुरू केले. परंतु ती सापडली नाही. घरचे तिला शोधत राहिले परंतु काहीच सुगावा लागला नाही. न्यूज अँकर सलमा बेपत्ता झाली ही बातमी स्थानिक पत्रकार आणि लोकांमध्ये पसरली. वेगवेगळ्या अफवा उडू लागल्या. सलमा मुंबईला गेली ही अफवा खूप चालली. परंतु सलमा कुठे आहे याचे कारण कुणी शोधले नाही.

२०१९ मध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद

सलमाचे कुटुंब तिचा शोध घेऊन थकले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला. जवळपास २ महिन्यांनी जानेवारी २०१९ मध्ये कुसमुंडा पोलीस ठाण्यात सलमा सुल्ताना बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. परंतु सलमाचा शोध पोलिसांनाही लागला नाही. कुटुंबानेही अपेक्षा सोडली. परंतु याचवर्षी एसपी रॉबिन्सन यांनी सलमा केस पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आणि नव्याने तपासाला सुरुवात केली.

तपासावेळी मिळाला सुगावा

आयपीएस अधिकारी रॉबिन्सन यांनी या केसशी निगडीत सगळ्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले. एक एक करून सगळ्यांची चौकशी होत होती. तपासात अनेक तथ्ये समोर येत होती. ज्यात सलमाचा खून झाल्याचा सुगावा लागला. ३० मे रोजी पोलिसांना कळाले सलमा सुल्ताना आता या जगात नाही, तिचा खून झालेला आहे. पोलिसांनी सखोल चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा गुन्हेगाराने सलमाचा मृतदेह कोरबा दर्री मार्गावरील एका तलावाशेजारी दफन केल्याचे समजले. घटनास्थळी पोलिसांनी जेसीबी मशिनने उकरून पाहिले पण हाती निराशा लागली. ५ वर्षानंतर त्याठिकाणची स्थिती बदलली होती. दफन केलेल्या ठिकाणी रस्ता बनला होता.

त्यामुळे पोलिसांनी ३ डी स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यात एक पुरावा सापडला. ज्याठिकाणी शोध सुरू होता तिथे एका गोणीत मानवी हाडे जप्त करण्यात आली. ही हाडे एका मुलीची आहेत असं कळाले. पोलिसांनी हाडे जप्त करून लॅबमध्ये पाठवली. त्यानंतर पुढील तपास आणखी वेगाने सुरू झाला.

चौकशीवेळी सलमाने कोरबातील एका बँकेतून कर्ज घेतल्याचे समोर आले. २०१८ पर्यंत या कर्जाचे हफ्ते एक युवक फेडत होता. परंतु २०१९ पासून त्याने कर्जाचे हफ्ते फेडणे बंद केले. सलमाने युवकाला हफ्ते भरण्यास सांगितले होते. परंतु त्याने नकार देत सलमाशी वाद घालू लागला. परंतु हा युवक कोण हा प्रश्न पोलिसांना पडला. पोलिसांचे खबरी सक्रीय झाले. सलमाचे एका युवकासोबत अफेअर होते. ज्याचे नाव मधूर साहू. हा बिलासपूर येथे राहत होता. कोरबा इथं तो जिम चालवायचा. मधूर आणि सलमा यांच्यात आधी मैत्री झाली त्यानंतर ते एकमेकांवर प्रेम करू लागले. पोलिसांनी मधूरवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

चौकशीवेळी मधूरच्या मोलकरणीबाबत पोलिसांना कळाले, तिला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा सलमाच्या हत्येचा उलगडा झाला. तिने पोलिसांना सांगितले की, सलमाची हत्या २०१८ मध्ये झाली होती. मधूर साहू आणि त्याच्या मित्रांनी हे घडवून आणले. परंतु सलमाचा खून केल्यावर मधूर फरार झाला होता. त्यानंतर कालांतराने तो पुन्हा कोरबा येथे आला. पोलिसांनी हत्येचा उलगडा होताच मधूर साहूसह त्याच्या साथीदारांना अटक केली आणि ५ वर्षांनी या हत्येचे रहस्य उघडले.

 

Web Title: Love, betrayal and murder..! After 5 years, the mystery of news anchor's Salma Sultana murder was revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.