प्रेम, गर्भपात आणि खून; जंगलात आढळला सांगाडा, पोलिसांनी असा लावला प्रकरणाचा छडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 09:04 PM2023-03-29T21:04:45+5:302023-03-29T21:05:28+5:30
13 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या तरुणीच्या खुनाचा उलगडा झाला आहे.
रांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये 27 दिवसांपूर्वी सापडलेल्या सांगाड्याचा खुलासा झाला आहे. हा सांगाडा बेपत्ता झालेल्या 22 वर्षीय तरुणीचा असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी मारेकऱ्यालाही अटक केली आहे. चौकशीत त्याने सांगितले की, प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावला होता, त्यामुळेच कंटाळून त्याने आधी तिची हत्या केली आणि त्यानंतर जंगलात नेऊन मृतदेह जाळला. पोलिसांनी 52 दिवसांनंतर खुनाचा छडा लावला.
ही घटना ओरमांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उक्रीड डोंगरातील आहे. 27 फेब्रुवारी रोजी सापडलेला सांगाडा रश्मी मुंडा (22) नावाच्या तरुणीचा असून, ती चुटिया पोलीस स्टेशन हद्दीतील महादेव टोली येथील रहिवासी होती. ती 13 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती आणि तिच्या कुटुंबीयांनी 14 फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सतत तपास सुरू ठेवला. मात्र, पोलिसांना कोणताही सुगावा लागला नाही. मुलीच्या घरच्यांना तिच्या खोलीत मुलीची डायरी सापडली. डायरीच्या पानांमध्ये एक स्लिप दिसली, ती पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली.
गर्भपाताच्या स्लिपने मारेकरी पकडला
रश्मीच्या कुटुंबीयांना गर्भपाताची स्लिप सापडली. ती स्लिप घेऊन कुटुंबीय तात्काळ चुटिया पोलिस स्टेशनचे प्रभारी व्यंकटेश कुमार यांच्याकडे पोहोचले. पोलिसांनी तातडीने नर्सिंग होम गाठून या प्रकरणाचा तपास केला. ज्यामध्ये मृत रश्मीचा प्रियकर पंकज महतोचा पर्दाफाश झाला. 13 फेब्रुवारीला रश्मी त्याच्याकडे आली होती आणि त्याच्यासोबत राहण्याचा आग्रह करू लागली. समज देऊनही ती घरी परतण्यास तयार नव्हती. रात्री दोघांमध्ये भांडण झाले आणि आरोपीने जड वस्तूने रश्मीचा डोक्यात वार करुन तिचा खून केला. त्यानंतर तिला गोणीत भरुन तो जंगलात गेला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना पेट्रोल ओतून तिला जाळले. प्रेमप्रकरणात ती गरोदर राहिल्याचेही त्याने सांगितले.