प्रेम, पैसा आणि ‘त्या’ आठ हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2023 08:52 AM2023-06-04T08:52:25+5:302023-06-04T08:53:47+5:30

जीवनात काहीतरी भव्यदिव्य करण्याची जिद्द योग्य मार्गाने पुढे नेली, तर त्यातून त्या व्यक्तीचे किंवा समाजाचेही भले होते. पण ही जिद्द चुकीच्या मार्गावर गेली, तर किती महाभयंकर हत्याकांड होऊ शकते, याचे उदाहरण पाहून 22 वर्षांपूर्वी मुंबई शहर हादरून गेले होते.

love money and those eight murder case in mumbai | प्रेम, पैसा आणि ‘त्या’ आठ हत्या

प्रेम, पैसा आणि ‘त्या’ आठ हत्या

googlenewsNext

रवींद्र राऊळ, वृत्तसंपादक

गोरेगावच्या इंडस्ट्रियल झोनमधील प्लास्टिकच्या त्या कारखान्यात सुधाराम नेहमीप्रमाणे ड्युटीवर पोहोचला. पण कारखान्यात एकदमच सन्नाटा. नेहमी वावरणाऱ्या आठ - दहा कामगारांपैकी एकही कारखान्यात हजर  नसल्याने तो बुचकळ्यात पडला होता. ज्या कामगारांना कारखान्यातच राहायची परवानगी होती, तेही दिसत नव्हते. गेले असतील कुठेतरी, असे म्हणत त्याने कामाला सुरुवात करण्यासाठी रिकामा ड्रम जवळ ओढला. पण तो ड्रम जागचा हलेचना. घट्ट बसवलेले ड्रमचे झाकण त्याने उघडले आणि तो हादरलाच. आत त्याच्या एका सहकाऱ्याचा अचेतन देह होता. त्याने किंकाळीच फोडली. शेजारचे धावत आले. त्यांनी जवळचा दुसरा ड्रम उघडला. त्यात दुसरा सहकारी. रांगेतले सर्व ड्रम त्यांनी उघडले. पाच ड्रममध्ये कामगार, सहाव्यात खुद्द कारखाना मालक आणि दुसऱ्या दोन ड्रममध्ये त्याचे नातेवाईक, असे आठ मृतदेह ड्रममधून बाहेर काढण्यात आले.

चौकशीत पोलिसांना कारखान्यातील इतर चार कामगार बेपत्ता असल्याचे आढळल्याने त्यांच्यावरील संशय बळावला. त्यातील एक अमरजित सिंह याचे शेजारच्या कारखान्यातील हेलनसोबत प्रेमसंबंध होते. ताबडतोब पोलिस भाईंदर येथील हेलनच्या घरी पोहोचले. अमरजितचा फोन आला, तर आपल्या घरी आश्रय देते, असे सांगून त्याला घरी बोलावण्यास सांगितले. तितक्यात त्याचा फोन आलाच. बोरीवली येथून हेलनशी संपर्क साधणाऱ्या अमरजितच्या पोलिसांनी जागीच मुसक्या आवळल्या.

चौकशीत अमरजित सिंह भडाभडा बोलू लागला. हेलन आणि अमरजित यांच्या प्रेमसंबंधांना विरोध असणाऱ्या हेलनचा भाऊ थॉमस याने त्याला सुनावले होते, ‘अरे, तुझी लायकी काय? तुझा पगार फक्त दोन हजार रुपये. माझ्या बहिणीसोबत लग्न करायचे असेल तर आधी कुणीतरी मोठा होऊन दाखव.’ त्याचे हे वाक्य बाणासारखे अमरजितच्या डोक्यात शिरले. त्याच सुमारास त्याचा मित्र गुलजार सिंह पंजाबहून मुंबईला आला होता. एके दिवशी दोघे गदर - एक प्रेमकथा चित्रपट पाहायला गेले. त्यातील सनी देवोलचा डायलॉग त्यांच्या मनावर ठसला.  चित्रपट पहिल्यापासून ते दोघेही कारखान्याशेजारील गुलाम खानच्या दुकानात बसून त्याबाबत चर्चा करू लागले. गुलाम खान म्हणाला, ‘पैसे कमवून मोठे व्हायचे असेल, तर तुमच्या मालकाला लुटा.’ तिघांनी प्लॅन रचला. 

एके दिवशी तिघे कारखान्यात गेले. अमरजितने मालक दुगलारामशी गुलजार सिंहची ओळख करून देत त्यालाही आपल्यासोबत कारखान्यात राहण्याची परवानगी मिळवली. एके रात्री तिघांनी सकाळी दुगलाराम कारखान्यात येताच त्याला धमकावून कोऱ्या चेकवर सह्या घेऊन ते वटवायचे ठरवले. पण त्यावेळी कारखान्यातील इतर कामगार आपल्याला साथ देणार नाहीत,  असा संशय तिघांना आला. म्हणून सात कामगार आणि दुगलारामचा मेहुणा यांना संपवायचे त्यांनी नक्की केले. 

ठरल्याप्रमाणे एके रात्री त्यांनी दोन कामगार वगळता कारखान्यातल्या इतर कामगारांना विष घातलेला चहा पाजला. सर्व बेशुद्धावस्थेत गेले. मग त्यांनी सर्वप्रथम दुगलारामच्या मेहुण्याची दोरखंडाने हत्या केली. त्यानंतर पहाटे पाच वाजता एकाला मटेरियल आल्याचे सांगून दुगलारामला बोलवायला त्याच्या घरी पाठवले. पण दुगलारामऐवजी त्याचा भाऊ जपाराम आला. आरोपींनी त्याची आणि दुगलारामला बोलावण्यासाठी पाठवलेल्याचीही हत्या केली. दुगलाराम सर्वात शेवटी आला. त्याला चाकू आणि खेळण्यातील बंदूका दाखवत चेकवर सह्या घेतल्या आणि त्याचीही हत्या केली. 

हे सारे नाट्य सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत चालले होते. त्यानंतर कारखान्याबाहेर पडलेले आरोपी थेट बँकेत जाऊन चेक वटवत लाखो रुपये घेऊन पसार झाले. पण सारे आरोपी दुसऱ्याच दिवशी पकडले गेले. न्यायालयात खटला चालून त्यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली.


 

Web Title: love money and those eight murder case in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.