पोलिसांचे खाकीतले प्रेम... भायखळ्यात तक्रारदाराचा केला वाढदिवस साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 09:44 PM2018-07-23T21:44:43+5:302018-07-23T21:45:30+5:30
चोरीस गेलेली मोटारसायकल दिली भेट
मुंबई - पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास अनेकांना भीती वाटते. मात्र मोटारसायकल चोरीस गेलेल्या तरुणाला पोलिसात तक्रार दाखल करण्यास गेल्यावर एक चांगला अनुभव घेता आला. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या मुलाच्या कागदपत्रांवर त्याची जन्मतारीख असल्याने सरप्राईझ देत केक मागवून पोलिसांनी त्याचा वाढदिवस साजरा केला.
अनेक गुन्ह्यांची उकल पोलीस रोज करत असतात. पण एखाद्या दिवशी एकाद्या पोलिसाच्या चुकीमुळे अख्ख्या पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होते. हा चुकीचा समज दूर करणारी एक सरप्राईझ गोष्ट भायखळा पोलीस ठाण्यात घडली आहे. 21 व 22 जुलै 2018 रोजी भायखळा पोलिसांनी जन्मदिनादिवशी दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद द्यायला आलेल्यांपैकी एकाचा पोलीस ठाण्यातच केक कापून वाढदिवस साजरा करून त्याला त्याची हरवलेली दुचाकी परत मिळवून दिल्याची माहिती भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांनी दिली.
भायखळा पोलिसांच्या रूपाने पुन्हा एकदा खाकीतले प्रेम समोर आले. इतकेच नव्हे तर पोलिसांनी काही तासांत चोरट्यांच्या मुसक्या आवळून दुचाकी चोरीचा छडा लावला. दुचाकी चोरांना तात्काळ अटक करून भायखळा पोलिसांनी एका प्रकारे तरुणाला वाढदिवसाची भेट दिली.