लव्ह, सेक्स और धोका... लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकराने प्रेयसीचा काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 07:51 PM2019-02-08T19:51:42+5:302019-02-08T19:53:08+5:30
दोन महिन्यांनी पुरलेले प्रेत पोलिसांनी काढले बाहेर
मुंबई - मानखुर्द येथे राहणाऱ्या रोहिणी घोरपडे (२८) या महिलेच्या हत्येचं गूढ तब्ब्ल दोन महिन्यांनी उलगडलं आहे. गेल्या वर्षी १४ नोव्हेंबरला घरातून मैत्रिणीच्या लग्नाला जाते सांगून गेलेली रोहिणी घरी पुन्हा परतलीच नाही. त्यानंतर मानखुर्द पोलिसांनी मोठ्या शिताफीने तीन आरोपींना अटक करून काल रायगड जिल्यातील माणगांव येथील शिरसाड गावात पुरलेला रोहिणीच्या मृतदेह बाहेर काढला. मृतदेह माणगांव येथील ग्रामीण रुग्णालयातून जे जे रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
दोन दिवसांनी रोहिणीच्या भावाने मानखुर्द पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तपासात रोहिणीचे नवी मुंबई येथील नोकरीच्या ठिकाणी सुनील शिर्के नावाच्या इसमाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी मोठया चतुराईने रोहिणीच्या एसबीआय बँक खात्याची माहिती घेतली. दरम्यान तिच्या एटीएममधून १६ नोव्हेंबरला कोपरखैराणे येथील एटीएममधून ६५ हजार रुपये काढल्याचे अधिक तपासात समोर आलं आणि तेथेच पोलिसांना या गुन्ह्याचा धागादोरा सापडला. पैसे काढणारा इसम हा रोहिणीच्या प्रियकराचा मित्र राम जाधव होता.
राम आणि सुनील हे दोघे रोहिणीच्या काटा काढण्यासाठी सतत संपर्कात होते. महत्वाचे म्हणजे रायगड जिल्ह्यतील माणगाव येथील शिरसाड येथे सुनीलने रोहिणीच्या काटा काढण्याआधीच खड्डा खोदून ठेवला होता. पोलिसांनी रामचा माग काढत त्याला ताब्यात घेतले आणि नंतर रोहिणीच्या खुनाचे गूढ उलगडत गेले. १४ नोव्हेंबरला कारने सुनील आणि रामने रोहिणीला माणगावला नेले. कार चालक विजयसिंह मोरे हा देखील सुनीलचा मित्र. राम आणि विजयसिंहच्या मदतीने सतत लग्नसाठी आग्रह धरत असलेल्या रोहिणीचा नियोजनपूर्वक काटा काढला. लग्नाचा तगादा लागल्याने रोहिणी आणि सुनील यांच्यात सतत वाद होत. शेवटी तिघांनी मिळून माणगाव येथील शिरसाड गावात नेवून रोहिणीच्या डोक्यात लाकडी फावड्याने जोरदार प्रहार करून तिला ठार केले. आणि दोन दिवस अगोदर खोदून ठेवलेल्या खड्ड्यात तिचा मृतदेह पुरला. पोलिसांनी राम, सुनील आणि विजयसिंहला ६ फेब्रुवारीला अटक केली असून दोन महिन्यानंतर पुरलेले रोहिणीचे प्रेत बाहेर शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठविण्यात आले. दोन महिन्यांनी मानखुर्द पोलिसंनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळून हत्येचा गुन्हा उघड केला आहे.