बदल्याची आग! ब्रेकअपनंतर 60 वर्षीय प्रियकराचा 48 वर्षीय प्रेयसीवर हल्ला; फेकलं अॅसिड अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 04:39 PM2022-05-23T16:39:11+5:302022-05-23T16:47:16+5:30
एक 60 वर्षीय व्यक्ती आणि 48 वर्षीय महिलेचे प्रेमसंबंध होते. दोघांचे प्रेमप्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. मात्र, काही कारणामुळे त्यांच ब्रेकअप झालं.
नवी दिल्ली - प्रेमाला वयाचं बंधन नसतं. कधीही कोणाच्याही प्रेमात पडू शकतो. पण अनेकदा या प्रेमातूनच सूड, बदला अशा गोष्टी समोर येतात. कधी कधी अत्यंत भयंकर प्रकार घ़डल्याचं देखील आपण पाहतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. बिहारच्या बेतियामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली. एका 60 वर्षीय प्रियकराने 48 वर्षीय प्रेयसीवर हल्ला केला आहे. प्रेमात दुरावा आल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या बेतियामध्ये एक 60 वर्षीय व्यक्ती आणि 48 वर्षीय महिलेचे प्रेमसंबंध होते. दोघांचे प्रेमप्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. मात्र, काही कारणामुळे त्यांच ब्रेकअप झालं. मुलांवरून वाद झाल्याचं समोर आलं आहे. प्रेमसंबंध तुटल्याच्या रागात संतापलेल्या 60 वर्षीय प्रियकराने आपल्या 48 वर्षीय प्रेयसीवर थेट अॅसिड फेकले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अॅसिड हल्ल्यात ही 48 वर्षीय प्रेयसी गंभीररित्या भाजली आहे. या अॅसिड हल्ल्यानंतर तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांमध्ये बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र, मुलांवरुन दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. या पुरुषावर आपले प्रेम नाही असं पीडित महिलेने कॅमेऱ्यासमोर सांगितलं आहे. पण दोघांच्या प्रेमसंबंधाची गावात चर्चा सुरू आहे.
प्रियकराने दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षांपूर्वी माझ्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आमच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अनेक वर्षांपासून आमच्यात चांगले संबंध होते. पण मुलांमुळे सर्व बिघडलं. पण एकाच गावात असल्याने आम्ही बऱ्याचवेळा एकमेकांसमोर येतो. मी अॅसिड फेकलंच नाही असं प्रियकराने पोलिसांना सांगितलं आहे. तसेच मला मुद्दाम यामध्ये अडकवलं असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.