पनीरची भाजी खाल्ल्यानंतर प्रियकराचा मृत्यू, प्रेयसी गंभीर; फूड पॉयझन की आणखी काही? पोलिसांकडून शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 12:53 AM2022-03-20T00:53:04+5:302022-03-20T00:53:42+5:30
वर्षभरापूर्वी होळीच्या दिवशी रितिक आणि त्याच्या भावासोबत एका तरुणाचे भांडण झाले होते. त्यावेळी त्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न रितिक आणि त्याच्या भावाने केला होता.
नागपूर - रात्री त्यांनी हॉटेलमधून पनीरची भाजी विकत घेतली. ती खाल्ल्यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले. रात्री उशिरा त्यांना उलट्या सुरू झाल्याने घरच्यांनी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला. तर तरुणी गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
रितिक खोब्रागडे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो अजनीत राहतो. त्याची प्रेयसी अजनीतीलच दुसऱ्या भागात राहते. गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे सोबत फिरले. नंतर त्यांनी एका हॉटेलमधून पनीरची भाजी विकत घेतली. ती आणून खाल्ल्यानंतर दोघांनी एकमेकांना ‘बाय’ करीत आपापले घर गाठले. रात्री रितिकला उलट्या होऊ लागल्या. तोंडातून फेस येत असल्याने घरच्यांनी रितिकला रुग्णालयात दाखल केले. तिकडे तिच्याही बाबतीत असेच घडल्याने तिच्या घरच्यांनीही तिला मेडिकलमध्ये नेले. उपचार सुरू असताना रितिकचा मृत्यू झाला. शनिवारी अजनी पोलिसांना हा प्रकार माहीत पडला. त्यानंतर सायंकाळपासून उलटसुलट चर्चेला उधाण आले. ठाणेदार सारिन दुर्गे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच रितिकच्या घरी तसेच त्या तरुणीच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली. फूड पॉयझन झाले, असा संशय दोघांच्याही घरच्यांनी दिलेल्या माहितीतून व्यक्त करण्यात आला. डॉक्टरांच्या अहवालातून मात्र ते स्पष्ट झाले नाही.
... तर, इतरांना का नाही ?
ज्या हॉटेलमधून या दोघांनी खाद्यपदार्थ घेतले, त्या हॉटेलमधून अनेक ग्राहकांनी त्याचवेळी तीच भाजी विकत नेली. काहींनी तेथेच जेवणही केले. मात्र, रितिक आणि त्याची मैत्रिण वगळता अन्य कुणालाही काही त्रास झाला नाही. त्यामुळे हा फूड पाॅयझनचा प्रकार आहे की आणखी काही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
वर्षभरापूर्वीची ‘ती’ घटना -
वर्षभरापूर्वी होळीच्या दिवशी रितिक आणि त्याच्या भावासोबत एका तरुणाचे भांडण झाले होते. त्यावेळी त्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न रितिक आणि त्याच्या भावाने केला होता. त्या गुन्ह्याखाली अजनी पोलिसांनी रितिक आणि त्याच्या भावाला अटकही केली होती. आता बरोबर होळीच्याच वेळी ही घटना घडल्याने शंका-कुशंकांना पेव फुटले आहे.