गर्लफ्रेंडला घरी बोलवलं...केक कापला, मग चाकूने तिचा गळा कापला; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 02:44 PM2023-04-15T14:44:21+5:302023-04-15T14:45:43+5:30
Crime News : ही घटना लागेरे भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियकराला संशय होता की, त्याच्या प्रेयसीचं दुसऱ्या कुणासोबत अफेअर सुरू आहे.
Crime News : कर्नाटकच्या बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा आधी वाढदिवस साजरा केला. नंतर थोड्या वेळाने चाकूने वार करत तिचा गळा कापून तिची हत्या केली. ही घटना लागेरे भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियकराला संशय होता की, त्याच्या प्रेयसीचं दुसऱ्या कुणासोबत अफेअर सुरू आहे.
याच कारणाने त्याने तिची हत्या केली. पोलिसांनुसार, मृत तरूणीचं नाव नव्या असून ती 24 वर्षांची होती. ती पोलीस विभागात क्लार्क म्हणून नोकरी करत होती. तिचं प्रशांत नावाच्या तरूणासोबत गेल्या 6 वर्षापासून अफेअर सुरू होतं. दोघेही नात्याने चुलत भाऊ-बहीण लागत होते.
त्यांच्या अफेअरची माहिती त्यांच्या परिवाराला नव्हती. यादरम्यान प्रशांतला संशय आला की, नव्याचं एका दुसऱ्या तरूणासोबत अफेअर सुरू आहे. दोघांचा या मुद्द्यावरून वाद झाला. पण नंतर त्याच्या डोक्यातून हा विषय गेला नाही, त्यामुळे त्याने तिची हत्या करण्याचा प्लान केला.
प्रशांतने विचार केला की, नव्याची तिच्या वाढदिवसालाच हत्या करावी. त्यामुळे त्याने नव्याला हे सांगून बोलवलं की, त्याला तिचा वाढदिवस सोबत साजरा करायचा आहे. नव्या तयार झाली आणि त्याच्या घरी आली. इथे प्रशांतने रूम पूर्ण सजवली होती.
त्याने नव्याला वाढदिवसाचा केक कापण्यास सांगितलं. नंतर चाकूने तिचा गळा कापून तिची हत्या केली. तिची हत्या करून तो तिथून फरार झाला. दुसरीकडे जेव्हा नव्या घरी परत आली नाही तेव्हा तिच्या परिवाराने ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांच्या चौकशीनंतर तिचं शेवटचं लोकेशन प्रशांतच्या घरी मिळालं.
पोलीस जेव्हा प्रशांतच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना नव्याचा मृतदेह सापडला. मृतदेह ताब्यात घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. नंतर प्रशांतचा शोध घेऊन त्यालाही लगेच अटक करण्यात आली. आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. पुढील कारवाई सुरू आहे.