धावत्या ट्रेनसमोर प्रेमी युगलानं मारली उडी; आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:13 PM2022-08-12T12:13:22+5:302022-08-12T12:13:45+5:30
हे प्रकरण सदर ठाणे हद्दीतील सांडा गाव येथील आहे. गुरुवारी रात्री प्रेमी युगलाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून जीव दिला.
धौलपूर - राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात एका प्रेमी युगलानं ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले असून घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. ज्यात प्रेमी युगलाने आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांची नावं लिहिली होती. या घटनेनंतर मृतकांच्या कुटुंबामध्ये शोककळा पसरली आहे.
हे प्रकरण सदर ठाणे हद्दीतील सांडा गाव येथील आहे. गुरुवारी रात्री प्रेमी युगलाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून जीव दिला. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी सोशल मीडियावर सुसाईड नोट पोस्ट केली होती. जी अल्पवयीन प्रेयसीनं लिहिली होती. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी प्रेयसीनं ८ जणांना दोषी ठरवलं होते. त्याचसोबत प्रियकर सोनूच्या कुटुंबाला काहीही त्रास देऊ नका असं म्हटलं आहे. सोशल मीडियावरील सुसाईड नोटबाबत मृत युवकाच्या मित्रांनी पोलिसांना कळवलं.
सुसाई़ड नोटमध्ये काय लिहिलं?
सुनील, पूजा, पीयूष, पंकज, लक्ष्मी, भूरी देवी, रामवीर यांच्यामुळे आम्ही आत्महत्या करतोय. आमच्या मृत्यूनंतर सोनूच्या कुटुंबावर कुठलाही आरोप ठेवू नये. आम्ही शुद्धीत हे सगळं लिहितोय. हे ८ जण मला सोनू सोबत लग्न न करण्यासाठी दबाव टाकत होते. आम्ही दोघांनी मरावं अशीच त्यांची इच्छा होती. त्यासाठी आम्ही आमचं जीवन संपवतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी वारंवार सांगेन आमच्या मृत्यूनंतर सोनूच्या घरच्यांवर कुठलाही आळ लावू नका, त्यांना त्रास देऊ नका असं म्हटलंय.
या प्रकरणी एएसआय हाकिम सिंह म्हणाले की, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एका युवक-युवतीने आत्महत्या केल्याची सूचना पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलो तेव्हा तिथे दोघेही मृत अवस्थेत आढळले. या दोघांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमोर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितले.