नागपुरात प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:32 AM2020-02-05T00:32:03+5:302020-02-05T00:33:31+5:30
एकमेकांचे होणार नाही, हे ध्यानात आल्याने प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी ४. ३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने गांधीबाग पार्क परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकमेकांचे होणार नाही, हे ध्यानात आल्याने प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीने जहर ओकले, मात्र प्रियकराने ते घेतल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. मंगळवारी सायंकाळी ४. ३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने गांधीबाग पार्क परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली.
पुण्याजवळ राहणारा ओमकार कुताड (वय २३) बीएच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. तीन वर्षांपूर्वी त्याची नागपुरातील एका तरुणीसोबत फेसबुकवरून फ्रेण्डशिप झाली. सलग संपर्कामुळे त्यांचे प्रेम फुलले. नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. हिंमत करून त्याने तिचे घर गाठले आणि तिच्या कुटुंबीयांना तिचा हात मागितला. घरच्यांनी स्पष्ट नकार दिला. तो निराश होऊन परतला, मात्र त्यांचा ऑनलाईन संपर्क सुरू होता. दरम्यान, तिचे घरच्यांनी लग्न जुळविले. तिने हे दोन दिवसांपूर्वी त्याला कळविले. तो अस्वस्थ झाला. थेट नागपुरात पोहचला. मंगळवारी दुपारी हे दोघे गांधीबागमधील पार्कमध्ये भेटले. जीना मरना संग संग, अशी शपथ घेणाऱ्या या दोघांनी आपल्याला सोबत जगता येणार नाही, असा समज करून घेतला. त्यामुळे दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला. विष घेताच ओकारी आल्यामुळे प्रेयसी बचावली. मात्र, विषाचा घोट घेतल्याने प्रियकर लगेच तडफडू लागला. त्याची ती अवस्था पाहून प्रेयसी जोरजोरात ओरडली. गार्डसह बाजूची मंडळी धावली. त्यांनी या दोघांना मेयोत पोहचवले. माहिती कळाल्यानंतर तहसील पोलीसही पोहचले. प्रियकराची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त लिहिताना पोलिसांकडून कळले.
विष कुठून आणले
या दोघांना मृत्यूच्या जबड्यात पोहचविणारे विष कुणी आणि कुठून आणले, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. विष घेण्याऐवजी ते पळून जाऊन लग्न करू शकले असते. त्यांनी तसे न करता आत्मघाताचा निर्णय का घेतला, असाही प्रश्न पोलिसांना पडला आहे.