भाजपा नेत्यानं स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये पत्नीला धरलं जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 08:35 AM2021-10-26T08:35:08+5:302021-10-26T08:36:47+5:30
पोलिसांनी पाहणी केली असता मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोटही सापडली. त्यात व्यक्तीने आत्महत्येसाठी त्याच्या पत्नीला जबाबदार धरलं आहे.
लखनऊ – उत्तर प्रदेशातील राजधानी लखनऊ येथे ह्द्रय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका व्यक्तीने पत्नीपासून त्रस्त होऊन स्वत:वर गोळी झाडून घेतली आहे. त्यानंतर दुर्घटनास्थळीच व्यक्तीचा मृत्यू झाला असून या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचली. तेव्हा व्यक्तीचा मृतदेह एका खुर्चीवर पडलेल्या अवस्थेत आढळला.
पोलिसांनी पाहणी केली असता मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोटही सापडली. त्यात व्यक्तीने आत्महत्येसाठी त्याच्या पत्नीला जबाबदार धरलं आहे. त्याचसोबत पोलिसांना परवानाधारक पिस्तुल सापडली ज्यातून मृत व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडली होती. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. मृत व्यक्तीचं नाव अभिषेक शुक्ला असं आहे. तो मूळचा गोरखपूरच्या सिंघडिया कॉलनीतील रहिवासी आहे. नोकरीसाठी तो लखनऊला आला होता. लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी परिसरात नंदिनी अपार्टमेंटमध्ये राहत होता. अभिषेक शुक्ला हा स्थानिक भाजपा नेता होता.
एसीपी साउथ स्वाती चौधरी म्हणाल्या की, मृत अभिषेकने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. या नोटमध्ये आत्महत्येसाठी पत्नी कुमुदला जबाबदार धरलं होतं. कुमुद ओमेक्स सिटीत राहते. दोघांमध्ये मागील काही काळापासून वाद सुरू होता. त्यामुळेच अभिषेक वैतागला होता. अभिषेक शुक्ला चिंतेत जगत होता. घटनास्थळावरुन पोलिसांनी सुसाईड नोटसह मोबाईल फोन आणि घटनास्थळी सापडलेल्या काही वस्तू जप्त केल्या आहेत.
अभिषेक शुक्लानं घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे सगळेच हैराण आहेत. पोलिसांनी या संबंधात अभिषेकची पत्नी कुमुद हिला चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे. घटनेशी निगडीत सर्व पैलूवर तपास केला जाणार आहे. जे काही तथ्य बाहेर येईल त्या आधारावर कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अभिषेक शुक्ला आणि त्याची पत्नी कुमुद यांच्यात नेमका कुठला वाद होता? कुमुदनं पती अभिषेकला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सध्या अनुत्तरीत आहेत. मात्र अभिषेक शुक्लाच्या आत्महत्येने परिसरात खळबळ माजली आहे.