व्हिडिओत महिलेची छेडछाड करताना दिसला सरकारी अधिकारी, पोलिसांना अटक करण्यासाठी लागले 12 दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 11:46 AM2021-11-11T11:46:46+5:302021-11-11T11:51:34+5:30
Lucknow Crime News : याप्रकरणी पीडित महिलेने 29 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र आता 12 दिवसांनंतर आरोपी इच्छाराम यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे.
लखनऊ : लखनऊ सचिवालयात तैनात असलेल्या एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याची छेडछाड केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ महिलेने स्वतः बनवला आहे. महिलेने अवर सचिव इच्छाराम यादव याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने 29 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र आता 12 दिवसांनंतर आरोपी इच्छाराम यादव याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या हुसैनगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणारी पीडित महिला अल्पसंख्याक विभागात कंत्राटी पदावर कार्यरत आहे. पीडितेने अल्पसंख्याक कल्याण विभागातील सहाय्यक सचिव इच्छाराम यादव याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. दरम्यान, 2018 पासून इच्छाराम यादव सतत छेडछाड करत असल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.
या सततच्या छेडछाडीला वैतागून पीडितेने आरोपी सचिव इच्छाराम यादव याचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, इच्छाराम यादव हा महिलेची छेडछाड करताना दिसत आहेत आणि महिला स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आरोपी तिच्यावर जबरदस्ती करत आहे. तसेच, विरोध केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
पीडितेने हुसैनगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 29 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या महिलेला दोन-तीन वेळा बोलावून तिचे म्हणणे नोंदवण्यात आले. दोन्ही बाजूंचे जे काही पुरावे असतील, त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती एडीसीपी सेंट्रल ख्याती गर्ग यांनी दिली आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी अवर सचिव इच्छाराम यादवला अटक केली आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर 12 दिवसांनी ही अटक करण्यात आली आहे.