हुंड्यामध्ये मागितली 7 सीटर आलिशान कार आणि 10 लाख; न मिळताच पतीने दिला ट्रिपल तलाक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 01:57 PM2023-07-05T13:57:16+5:302023-07-05T13:58:11+5:30
हुंड्यामध्ये 7 सीटर आलिशान कार आणि 10 लाख न मिळाल्याने पतीने पत्नीला ट्रिपल तलाक दिला.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून ट्रिपल तलाकचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हुंड्यामध्ये 7 सीटर आलिशान कार आणि 10 लाख न मिळाल्याने पतीने पत्नीला ट्रिपल तलाक दिला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण लखनौच्या इंदिरानगर भागातील आहे. 2019 मध्ये, फरहीनचा निकाह आझमगडमधील फैसल हसनसोबत झाला होता. याच दरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नात हुंडा म्हणून कार आणि 25 लाख रुपये दिले. मात्र नंतर फरहीनच्या सासरच्यांनी तिचे सर्व दागिने ठेवल्याचा आरोप आहे.
2022 मध्ये नवऱ्याने फरहीनकडे 7 सीटर आलिशान कारसह आणखी 10 लाख रुपयांची मागणी केली. वडील अधिक हुंडा देऊ शकत नसल्याचे फरहीनने सांगितल्यावर सासरच्यांनी तिच्याशी भांडण सुरू केलं. तिचा दररोज मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. यानंतर एके दिवशी त्याने अचानक फरहीनला घराबाहेर हाकलून दिले.
फरहीनला तिच्या माहेरच्या घरी जाण्यास भाग पाडले. व्यथित झालेल्या पीडितेने तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर दोन्ही पक्षांना मध्यस्थी केंद्रात बोलावण्यात आले. पण पतीने तिला ट्रिपल तलाक दिला. पीडितेने पतीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कारवाई सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.