'शाळा सुरू करा नाहीतर...'; विद्यार्थ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना धमकीचा मेसेज!
By मोरेश्वर येरम | Published: November 25, 2020 01:50 PM2020-11-25T13:50:32+5:302020-11-25T14:02:22+5:30
उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ क्रमांकावर एक मेसेज आला. ज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांना शाळा आणि महाविद्यालयं अद्याप सुरू न केल्यामुळे विद्यार्थ्यांच होणाऱ्या नुकसानावरुन धमकीचा मेसेज केला गेला.
आग्रा
शाळा आणि महाविद्यालय अद्याप सुरू न केल्यानं एका विद्यार्थ्यानं थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकीचा मेसेज केला. उत्तर प्रदेश पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला अटक केली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ क्रमांकावर एक मेसेज आला. ज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांना शाळा आणि महाविद्यालयं अद्याप सुरू न केल्यामुळे विद्यार्थ्यांच होणाऱ्या नुकसानावरुन धमकीचा मेसेज करण्यात आला होता. मेसेज मिळताच पोलीस सतर्क झाले. लखनऊ पोलिसांनी मेसेज आलेल्या मोबाइल क्रमांकाचा तपास केला तेव्हा मेसेज आग्रा येथून आल्याचं समोर आलं, अशी माहिती पोलीस उपायुक्त रईस अख्तर यांनी दिली.
आग्र्याला पोहोचले लखनऊचे पोलीस
धमकीचा मेसेज आलेला मोबाइल क्रमांक आग्रा येथील असल्याचं कळाल्यानंतर लखनऊ पोलिसांनी आग्र्याला येण्यापूर्वी पोलीस ठाण्यात मोबाइल धारकाविरोधात एफआयआर दाखल केली. त्यानंतर लखनऊ पोलीस थेट आग्र्याला पोहोचले. पण धमकीचा मेसेज करणाऱ्या विद्यार्थ्याला पकडल्यानंतर तो अल्पवयीन असल्याचं पोलिसांना लक्षात आलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यानं सहज मेसेज केला असं सांगितलं. 'शाळा बंद असल्यानं आमचं नुकसान होत आहे, त्यामुळे मी मेसेज केला होता, असं तो म्हणाला.
पोलिसांनी मोबाइल आणि सीमकार्ड जप्त करुन अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.