'मुलगा आईला मारू शकत नाही', चौकशी पथकाचा दावा; संशयाची सुई तिसऱ्या व्यक्तीकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 12:35 PM2022-06-14T12:35:30+5:302022-06-14T12:35:42+5:30
Lucknow PUBG Murder: लखनौमध्ये PUBG खेळण्यापासून रोखल्याने एका अल्पवयीन मुलाने आईची गोळ्या झाडून हत्या केल्याचा दावा पोलिसांकडून होत आहे.
लखनौ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका 16 वर्षांच्या मुलाने आईची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्या हत्येचे गूढ उकलत चालले आहे. PUBG मुळे ही हत्या झाल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र मुलाची चौकशीदरम्यान संशयाची सुई इतर लोकांकडे फिरत आहे. सध्या उत्तर प्रदेश बाल संरक्षण आयोगाची टीम मुलाची चौकशी करत आहे.
उत्तर प्रदेश बाल संरक्षण आयोगाच्या टीमच्या म्हणण्यानुसार, मुलाने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांवरुन मूल आईची हत्या करू शकते का, अशी शंका निर्माण होत आहे. त्यामुळे आता बाल संरक्षण आयोगाची संशोधन शाखा या प्रकरणाची चौकशी करून मुख्य आरोपी शोधणार आहेत. आतापर्यंत आयोगाच्या पथकाने चौकशीदरम्यान मुलाने हत्या केल्याच्या दाव्यावर संशय व्यक्त केला आहे.
'मुलगा आपल्या आईला मारू शकत नाही'
बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या सुचिता यांच्या म्हणण्यानुसार, 'मुलाच्या उत्तरावरुन असे दिसते की, त्याचा आपल्या आईकडे कल होता, तो आपल्या आईला मारू शकत नाही. मुलगा भांडू शकतो, रागाच्या भरात घर सोडून जाऊ शकतो, परंतू विदेशी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याचे पटत नाही.' या हत्या कांडात तिसरा कोणीतरी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
रिसर्च विंग हे प्रकरण हाताळणार आहे
सुचिता म्हणाल्या की, आमची रिसर्च विंग या मुलाचे प्रकरण हाताळेल. यात 2 मानसशास्त्रज्ञ, 2 वकील, 2 डॉक्टर आणि 2 बाल संरक्षण आयोगाचे लोक समोरासमोर बसून विश्लेषण करतील. आम्ही पहिल्यांदाच एक संशोधन शाखा स्थापन केली आहे. कारण हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असून, यात सर्व पैलू तपासले जाणार आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
लखनौच्या पीजीआय परिसरात एका 16 वर्षांच्या मुलावर आईची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांचा दावा आहे की, आई मुलाला PUBG खेळण्यापासून रोखायची, त्यामुळेच मुलाने वडिलांच्या सर्व्हिस पिस्तुलातून आईवर सहा गोळ्या झाडल्या. हत्येनंतर तो तीन दिवस मृतदेहासोबत राहत होता. या तीन दिवसात क्रिकेट खेळण्यापासून ते पार्टीपर्यंत, त्याने सर्वकाही केले. मृतदेह कुजायला लागल्यावर त्याने आर्मीत असलेल्या वडिलांना फोन केला.