अडीच लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीची हत्या, आप नेत्यासह ६ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 12:35 IST2025-02-18T12:35:12+5:302025-02-18T12:35:28+5:30
पत्नीच्या हत्येप्रकरणी सोमवारी आप नेत्याला आणि त्यांच्या मैत्रिणीसह इतर चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक आरोपी अजूनही फरार आहे.

अडीच लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीची हत्या, आप नेत्यासह ६ जणांना अटक
पंजाबमध्ये पत्नीच्या हत्येप्रकरणी एका स्थानिक आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पंजाबमधील लुधियाना पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी सोमवारी आप नेत्याला आणि त्याच्या मैत्रिणीसह इतर चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक आरोपी अजूनही फरार आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोख मित्तल यांची पत्नी लिप्सी मित्तल (३३) हिची शनिवारी गावाजवळ हल्लेखोरांनी हत्या केली. अनोख आणि त्याची पत्नी लिप्सी लुधियाना-मालेरकोटला रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवण करून घरी परतत असताना ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, अनोख यांचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती त्यांच्या पत्नीला होती. त्यामुळे अनोख यांनी आपल्या पत्नीला मारण्याचा प्लॅन तयार केला. तसेच, यासाठी आरोपींना अडीच लाख रुपयांची सुपारी दिली होती. पत्नीची हत्या करण्यासाठी सुरूवातीला ५० हजार रुपये दिले होते आणि उर्वरित २ लाख रुपये हत्येनंतर देण्याचे ठरवले होते.
दरम्यान, अनोख यांनी सुरुवातीला पोलिसांना सांगितले होते की, शनिवारी लुधियाना-मालेरकोटला रस्त्यावरील हॉटेलमधून जेवण करून घरी परत येत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यानंतर हल्लेखोर त्यांची गाडी घेऊन पळून गेले.
पोलीस आयुक्त कुलदीप सिंह चहल यांनी सांगतिले की, हत्येचा मुख्य सूत्रधार महिलेचा पती असल्याचे निष्पन्न झाले. अनोख यांनी यापूर्वीही दोनदा आपल्या पत्नीला मारण्याची योजना आखली होती, परंतु काही कारणास्तव ते तसे करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी यावेळी पत्नीची हत्या करण्यासाठी सुपारी किलरला पाठवले, असे तपासात आढळून आले आहे.
आरोपीसह ६ जणांना अटक
पोलीस आयुक्त कुलदीप सिंह चहल यांनी सांगतिले की, पोलिसांनी महिलेचा पती अनोख मित्तल (३५) आणि त्यांच्या २४ वर्षीय मैत्रिणीला अटक केली आहे. याव्यतिरिक्त अमृतपाल सिंग उर्फ बल्ली (२६), गुरदीप सिंग उर्फ मन्नी (२५), सोनू सिंग (२४) आणि सागरदीप सिंग उर्फ तेजी (३०) यांनाही अटक करण्यात आली आहे.