सैन्य भरतीचे आमिष; तोतया अधिकारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 12:54 PM2022-11-22T12:54:34+5:302022-11-22T12:55:02+5:30
आष्टा पोलिसांनी आकाश डांगे याच्याकडून नौदल अधिकारी, पोलिस अधिकारी पोशाख, तसेच नियुक्तिपत्रे, शिक्के यांसह विविध कागदपत्रे जप्त केली आहेत.
आष्टा (जि.सांगली) : सैन्य दलात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून आष्टा परिसरातील सहा तरुणांना ३० लाखांचा गंडा घालणाऱ्या तोतया नाैदल अधिकारी आकाश काशीनाथ डांगे यास आष्टा पोलिसांनी अटक केली.
बहादूरवाडी येथील नितीन दळवी हा सैन्यात भरतीसाठी प्रयत्न करत होता. चार वर्षांपूर्वी एका सेवानिवृत्त जवानामुळे त्याची आकाश डांगेसोबत ओळख झाली. सैन्यात भरतीबाबत त्याने ग्वाही दिली. यानंतर, आकाश डांगे हा बहादूरवाडी येथे एका मोटारीतून नाैदल अधिकाऱ्याच्या वेशात आला. नितिनसोबत त्याचे मित्र संकेत माने, दीपक पाटील, रोहित दळवी, राजकुमार कोळी व राहुल गायकवाड हे सहा जण आकाशला भेटले. डांगे याने भरतीसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यानुसार, सहा जणांनी तीस लाख रुपये दिले. यानंतर, ऑक्टोबर, २०१९ मध्ये डांगेने सर्वांना नियुक्तिपत्र दिले व ओरिसा येथे मेडिकलसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. सर्व जण २१ मार्च, २०१९ रोजी आकाश सोबत रेल्वेने भुवनेश्वरला गेले. सर्वांना रेल्वे स्थानकावर थांबवून भरतीप्रक्रियेची माहिती घेण्याच्या बहाण्याने डांगे बाहेर गेला. काही वेळाने परत येत वादळामुळे ट्रेनिंग सेंटर विस्कळीत झाल्याने मेडिकल लांबणीवर पडले आहे, असे सांगितल्याने सर्व तेथून परत आले.
यानंतर, आकाश डांगेने पुन्हा नवीन नियुक्तिपत्रे दिली व २२ मे, २०२० रोजी मेडिकलसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. मात्र, कोरोना व लॉकडाऊनमुळे भरतीच झाली नाही. यानंतर सर्व जण डांगेच्या पाडळी येथील गावी गेले. यावेळी त्याने तीस लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, तो वटलाच नाही. अखेर सर्वांनी आष्टा पोलिस ठाण्यात डांगेविरोधात गुन्हा दाखल केला.
कागदपत्रे जप्त
आष्टा पोलिसांनी आकाश डांगे याच्याकडून नौदल अधिकारी, पोलिस अधिकारी पोशाख, तसेच नियुक्तिपत्रे, शिक्के यांसह विविध कागदपत्रे जप्त केली आहेत.