लंडनहून पुस्तके पाठविण्याची थाप : वैद्यकीय विद्यार्थ्याला लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 07:57 PM2020-07-07T19:57:02+5:302020-07-07T19:58:30+5:30

विदेशी फेसबुक फ्रेंडने लंडनमधून स्वस्तात वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके पाठवतो, असे सांगून मेडिकलच्या एका विद्यार्थ्याला १ लाख ४३ हजार रुपयाचा गंडा घातला. याप्रकरणी सोमवारी अजनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lure to send books from London: Medical student cheated | लंडनहून पुस्तके पाठविण्याची थाप : वैद्यकीय विद्यार्थ्याला लुबाडले

लंडनहून पुस्तके पाठविण्याची थाप : वैद्यकीय विद्यार्थ्याला लुबाडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदेशी फेसबुक फ्रेंडने लंडनमधून स्वस्तात वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके पाठवतो, असे सांगून मेडिकलच्या एका विद्यार्थ्याला १ लाख ४३ हजार रुपयाचा गंडा घातला. याप्रकरणी सोमवारी अजनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुण २५ वर्षांचा असून पोलिसांच्या माहितीनुसार, तो मेडिकलचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकवरून लंडनच्या इसाबेला लुसी नामक एका तरुणीसोबत त्याची मैत्री झाली. त्यानंतर हे दोघे आॅनलाईन संपर्कात होते. दोघांनीही एकमेकांबाबतची कौटुंबिक, व्यवसाय आणि शैक्षणिक माहिती एकमेकांना आदानप्रदान केली. लुसीने पीडित विद्यार्थ्याला आपला शैक्षणिक साहित्य आणि पुस्तके विकण्याचा व्यवसाय असल्याचे सांगितले. आमच्याकडे अत्यंत स्वस्त किमतीत वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके मिळत असल्याचेही तिने सांगितले. त्यामुळे पीडित तरुणाने तिला आपल्यासाठी काही चांगली पुस्तके पाठविण्यास सांगितले. २९ जूनला लुसीने फोन करून पीडित तरुणाला त्याची पुस्तके दिल्लीतील कस्टम अधिकारी प्रिया शर्मा हिच्या माध्यमातून पाठविल्याचे सांगितले.
ही पुस्तके मिळविण्यासाठी कथित कस्टम अधिकारी प्रिया शर्माचा मोबाईल नंबरही पीडित तरुणाच्या मोबाईलवर पाठवला. त्यावर विश्वास ठेवून पीडित तरुणाने प्रिया शर्मासोबत संपर्क साधला. शर्माने पीडित विद्यार्थ्याला दिल्लीतील आसिफ खान नामक व्यक्तीचा बँक खात्याचा नंबर दिला. हे आमचे कस्टम विभागप्रमुख आहेत, असे सांगून त्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्यानंतर पुस्तके मिळतील, असे सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्याने आसिफ खानच्या खात्यात इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून १ लाख ४३ हजार रुपये जमा केले. २९ जूनच्या सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हा व्यवहार पार पडला. त्यानंतर विद्यार्थ्याने पुस्तकांची डिलिव्हरी मागितली असता आरोपी टाळाटाळ करू लागले. ते असंबंद्ध माहिती देत असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्याला संशय आला. त्यामुळे त्याने आरोपींना तातडीने पुस्तक द्या अन्यथा पोलिसांकडे तक्रार करतो, असे म्हटले. त्यानंतर आरोपींनी पीडित विद्यार्थ्यांसोबत संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे पीडित विद्यार्थ्याने सायबर शाखेत धाव घेतली.
तेथून चौकशी झाल्यानंतर याप्रकरणी सोमवारी अजनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

लुसीनेच पाठविली होती फ्रेंड रिक्वेस्ट
या प्रकरणात कथित प्रिया शर्मा आणि आसिफ खानचे नाव आले असले तरी मुख्य सूत्रधार इसाबेला लुसी हीच असावी, असा संशय आहे. तिनेच नऊ महिन्यापूर्वी विद्यार्थ्याला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्याच्य संबंधीची आर्थिक, कौटुंबिक माहिती घेतल्यानंतर त्याला कशा पद्धतीने फसवता येईल, याबाबतचा कट लुसीनेच रचला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. पोलीस कथित लुसी आणि तिच्या साथीदारांचा तपास करीत आहेत.

Web Title: Lure to send books from London: Medical student cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.