नाेटा बदलून देण्याचे आमिष; व्यापाऱ्याला ९६ लाखांचा चुना; 8 जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 09:52 PM2023-07-10T21:52:32+5:302023-07-10T21:52:51+5:30
याबाबत एमआयडीसी ठाण्यात साेलापूर, लातूर, रेणापूर, बीड, कळंबमधील आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
लातूर : कळंबच्या एका व्यापाऱ्याकडून ५०० च्या ९६ लाख रुपयांच्या नाेटा घेऊन त्यांना दाेन हजारांच्या १ काेटीच्या नाेटा देण्याचे आमिष दाखवीत गंडविल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी ठाण्यात साेलापूर, लातूर, रेणापूर, बीड, कळंबमधील आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, शनिवार, ८ जुलै राेजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कळंबमधील व्यापारी अजिंक्य अभय देवडा (वय ३२) यास मयूर धाेका (रा. कळंब, जि. धाराशिव), श्याम घाेगरदरे, संदीप शिवणीकर, बालाजी रसाळकर (तिघेही रा. साेलापूर), मेघश्याम पांचाळ (रा. चव्हाणवाडी, ता. गेवराई जि. बीड), इमाम शेख (रा. भाेकरंबा, ता. रेणापूर), किशाेर माने (रा. चाडगाव, ता. रेणापूर), बालाजी काेयले (रा. लातूर) यांनी आमच्याकडे दाेन हजारांच्या नाेटा आहेत. तुम्ही ५०० रुपयांच्या ९६ लाख रुपये किमतीच्या नाेटा घेऊन या. आम्ही तुम्हाला १ काेटी मूल्याच्या दाेन हजारांच्या नाेटा देताे, असे आमिष दाखविले. ९६ लाख रुपये, ५०० रुपयांच्या नाेटांच्या स्वरूपात अजिंक्य देवडा हे घेऊन आले. ८ जुलै राेजी सायंकाळी हरंगुळ रेल्वेस्थानक परिसरात एका गाेदामात नाेटांची अदलाबदल करण्याचे प्रकार सुरू हाेते. खबऱ्याने विवेकानंद चाैक ठाण्याचे पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पाेउपनि. महेश गळगटे, पाेहेकाॅ. संजय बेरळीकर, विनाेद चलवाड, पाेहेकाॅ. यादव यांच्या पथकाला माहिती दिली.
अचानकपणे गाेदामावर पाेलिसांनी मारला छापा...
खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर विवेकानंद चाैक ठाण्याच्या पथकाने गाेदामावर छापा मारला. दरम्यान, घटनास्थळी एमआयडीसी ठाण्याचे पाेलिसही दाखल झाले. त्यानंतर रविवारी दिवभर लातूर शहरात बनावट नाेटा सापडल्याची चर्चा सुरू हाेती. या नाेटा खऱ्या की खाेट्या, याचीही चर्चा सुरू हाेती.
...तर दाेन दिवसांनंतर माहिती पडली बाहेर..!
एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत ९६ लाखांच्या नाेटांबाबत कारवाई केल्यानंतर लातुरात चर्चेला उधाण आले. याबाबत ठाणे प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क हाेत नव्हता. घटनेची माहिती विचारली असता, तपास सुरू आहे. अद्याप नाेंद नाही, अशीच उत्तरे मिळत आहेत. शनिवारी झालेल्या कारवाईची माहिती दाेन दिवसांनंतर बाहेर पडली, हे विशेष..!