प्रेमनाट्य करीत केले गर्भवती, लग्न केल्यानंतर काढला काटा; तिघांना जन्मठेप
By नरेश रहिले | Published: June 29, 2024 08:13 PM2024-06-29T20:13:31+5:302024-06-29T20:13:41+5:30
चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कुवाढास येथे नेऊन तिचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला.
गोंदिया: दिव्यांग तरूणीला प्रेमात अडकवून तिला गर्भवती केल्यानंतर सोडण्याची तयारी होती. परंतु ती त्यालाच चिटकून असल्याने त्याने तिचा काटा काढला. यासाठी त्याने इतर दोन मित्राची मदत घेतली. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कुवाढास येथे नेऊन तिचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. ३२ आठवड्याची गर्भवती असलेल्या त्या महिलेचा खून करणाऱ्या तिघांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही सुनावणी २९ जून रोजी करण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्याच्या उमरेड येथील सकु उर्फ शितल शामराव राऊत (३०) या गर्भवती महिलेच्या खुनासंदर्भात तिघांना जन्मठेप व दहा हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. मो. समीर अस्लाम शेख (२६) रा. वाॅर्ड क्रमांक ४, बाजार वाॅर्ड लाखनी, जि. भंडारा, आशिफ शेरखाँ पठाण (३८) रा. बाबा मस्तानी, जि. भंडारा व प्रफुल्ल पांडुरंग शिवणकर (२५) रा. दुधा ता. उमरेड जि. नागपूर अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
नागपूरच्या बुट्टीबोरी येथे एका कंपनीत कामावर असलेल्या समीर शेखने आपल्या पत्नीला ढासगड येथे फिरण्याच्या बहाण्याने चिचगड परिसरात आणले होते. मित्राकडून तिचा गळा कापून खून करण्यात आला होता. उजव्या पायाने सकु दिव्यांग होती. २२ जून २०२१ रोजी तिला फिरायला जाऊ असे सांगून मोटारसायकलने चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुवाढास परिसरात आणले होते. आशिफ शेरखाँ पठाण (३८) रा. बाबा मस्तानी याने धारदार कात्याने सकुवर वार करून तिचा खून केला. चिचगड पोलिसांनी भादंविचे कलम ३०२, २०१ (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर ईस्कापे व उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकूल यांनी केला होता.
२० साक्षीदार तपासले
या प्रकरणात परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यात आले. या प्रकरणात २० साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदविण्यात आली. न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीत युक्तिवादानंतर सबळ साक्ष पुराव्यावरून आरोपींविरुद्ध गुन्हा दोष सिद्ध झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सतिश घोडे, सरकारी अभियोक्ता प्रणिता कुलकर्णी यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागी यपोलीस अधिकारी विवेक पाटील, पोली निरीक्षक तुषार काळेल यांच्या मार्गदर्शनात महिला नायक पोलीस शिपाई रिम्पी हुकरे यांनी काम पाहिले.
लास्ट कॉल थेरीने गुन्हा झाला सिध्द
चिचगड पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपींची कसली माहिती नसतांना सरकारी अभियोक्ता सतिश घोडे यांनी लास्ट कॉल थेरीने गुन्हा झाला सिध्द करविण्यासाठी खूप प्रयत्न केला. हा गुन्हा सिध्द करण्यासाठी या प्रकारणात सर्वोच्च न्यायालयाचे सात निर्णय न्यायाधीशांच्या समोर ठेवण्यात आले.
३२ आठवड्याची होती गर्भवती
मृतक सकु उर्फ शितल शामराव राऊत (३०) ही मृत झाली त्यावेळी ३२ आठवड्याची होती. तिचा डीएनए करण्यात आला. तो डीएनए आरोपी मो. समीर अस्लाम शेख (२६) रा. वाॅर्ड क्रमांक ४, बाजार वाॅर्ड लाखनी याच्याशी मॅच झाला.
खुन केल्यानंतर कोहमाराच्या बारमध्ये केली पार्टी
सकु उर्फ शितल शामराव राऊत हिचा खून केल्यानंतर तिन्ही आरोपी कोहमारा येथील मिलन बार येथे गेले. त्यांनी तिथे पार्टी केल्याचे तेथील सिसिटीव्हीत कैद झाले होते.
सकू राऊत खून प्रकरण तब्बल एक वर्ष न्यायालयात चालले. यासाठी १८७ कागदपत्र लावण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सात निर्णय जोडण्यात आले. या प्रकरणात खून करणाऱ्या आरोपीचा हा तिसरा खून असून यापूर्वी त्याने दोन खून केले आहेत. सकूच्या मारेकऱ्यांना जन्मठेप मिळाली. लास्ट कॉल थेरीवरच ही शिक्षा झाली आहे.
- सतीश घोडे, सहाय्यक सरकारी वकील गोंदिया.