भाजप आमदाराविरोधात बातमी दिल्यानं पोलिसांनी पत्रकारांचे कपडे उतरवले; नेमकं काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 09:46 AM2022-04-08T09:46:10+5:302022-04-08T10:48:58+5:30
पोलीस ठाण्यात नेऊन पत्रकारांचे कपडे उतरवले; फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल
सिधी: मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात पोलिसांनी काही पत्रकारांना अटक केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेऊन त्यांचे कपडे उतरवण्यात आले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांच्याविरोधात बातमी दिल्यानं पोलिसांनी अटकेची कारवाई केली. काँग्रेसनं या प्रकरणी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये यूट्यूब पत्रकार कनिष्क तिवारींचा समावेश आहे. नाट्यकर्मी नीरज कुंदर यांच्या अटकेविरोधात पोलीस ठाण्याबाहेर होत असलेल्या आंदोलनाचं वृत्तांकन करण्यासाठी तिवारी गेले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. भाजपचे आमदार केदारनाथ शुक्ला आणि त्यांचा मुलगा केदार गुरू दत्त शुक्ला यांच्याविरोधात फेक फेसबुक प्रोफाईलवरून आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप कुंदर यांच्यावर आहे. कुंदर हे इंद्रावती नाट्य समितीचे संचालक आहेत. राजकारण्यांनी केलेल्या तक्रारींवरून २ एप्रिलला कुंदर यांना अटक केली. यानंतर कुंदर यांचे पालक, स्थानिक आणि काही नाट्यकर्मी पोलीस ठाण्यात पोहोचले.
कनिष्क तिवारी वृत्तांकन करण्यासाठी पोलीस ठाण्याबाहेर गेले होते. वृत्तांकन करत असताना पोलिसांनी माझ्यासह कॅमेरामनला अटक केल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी अटक करून जवळपास १८ तास तुरुंगात ठेवलं, त्यांना आम्हाला मारहाण केली आणि कपडे काढायला लावले, असा आरोप तिवारींनी केला. शांततेचा भंग केल्याचा, अतिक्रण केल्याची कलमं त्यांच्यावर लावण्यात आली. आमदाराच्या विरोधात बातम्या कशाला करता, अशी विचारणा पोलिसांनी केल्याचं तिवारींनी सांगितलं.
सिधी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बघेली भाषेत यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या कनिष्क तिवारींसह अन्य काही जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. फेक आईडी तयार करणं, फेसबुकवर केदारनाथ शुक्ला, त्यांच्या मुलाची बदनामी करणाऱ्या पोस्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शुक्ला यांच्या मुलाच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला. यूट्यूबवर कनिष्क यांचे एक लाखाहून अधिक फॉलोअर आहेत. कनिष्क तिवारी मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.
एका फेक आयडीवरून फेसबुकवर अपमानास्पद पोस्ट केल्याचं सिधी पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी नीरज कुंदेरला अटक केली आहे. याविरोधात कनिष्कसह रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात निषेध नोंदवला. पोलिसांनी निषेध करणाऱ्या सगळ्यांना अटक केली.
कनिष्क तिवारी यूट्यूबवर आहे. त्याच्याविरोधात आधीच काही तक्रारी दाखल आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपींचं कपडे उतरवण्यात आले. त्यानंतर त्यांचे फोटो काढून व्हायरल करण्यात आले. त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४१९, २६२/२२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आयटीच्या कायद्याच्या ६६सी, ६६डी अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.