मध्य प्रदेशात रस्त्यावर लुटणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, संग्रामपूर तालुक्यातील आरोपी
By सदानंद सिरसाट | Published: July 11, 2024 11:33 PM2024-07-11T23:33:51+5:302024-07-11T23:33:51+5:30
बंदुकीचा धाक दाखवत महिलेचे दागिने लुटले
सदानंद सिरसाट, वरवट बकाल (जि. बुलढाणा): महाराष्ट्रातून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या रस्त्यावरील करोली घाटात दि. २ जुलै रोजी रात्री चारचाकी अडवत बंदुकीचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील दागिने लुटणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील चार आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांनी बुधवारी अटक केली. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ५४ वर्षीय महिला अनुपमा संतोष गुडगील्ला ही महिला चारचाकी (एमएच- २८, बीक्यू-३८१४) या वाहनाने वरवट बकाल येथील चालक गजानन वानरे याच्यासह कृषी केंद्राच्या बियाणे साहित्याच्या पार्सल व काही कामे आटोपून मध्य प्रदेशमधील बडवाह येथून रात्री करोली घाटातून घरी परत येत होती. रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी ते अडवण्यात आले. यावेळी चारजणांनी तोंडाला काळे रुमाल बांधलेले होते.
त्यांनी चालक वानरे यांच्या कानपट्टीवर बंदूक ठेवून चालकाच्या बाजूला बसलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन किंमत ३५ हजार रुपये, मंगळसूत्र किंमत ८८ हजार रुपये असे एकूण १ लाख २० हजार रुपये हा मुद्देमाल लुटून पोबारा केला. घटनेची फिर्याद मध्य प्रदेशातील शहापूर ठाण्यात देण्यात आली. अज्ञात आरोपीविरुद्ध ५०४/२०२४ कलम ३०९ (४) बीएनएसप्रमाणे गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला. शहापूर प्रभारी पोलिस निरीक्षक अखिलेश मिश्रा यांच्या नेतृत्वात तपास पथकांनी तांत्रिक साहाय्यांतर्गत टॉवर लोकेशननुसार गोपनीय माहिती मिळविली. त्यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील रिंगनवाडी येथील मुख्य आरोपी प्रशांत रावनकार (३०) याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलायला लागला.
साथीदार असलेला दत्ता शंकर लोणे, अविनाश हरिभाऊ झोपे, (दोघे रा. अकोली), तर अमोल सोळंके (रा. निवाना, ता. संग्रामपूर) या चौघांना ताब्यात घेतले. रावनकार याच्या ताब्यातून सोन्याचे २५ ग्राम मंगळसूत्र व अविनाश झोपे याच्या ताब्यातून घटनेत वापरलेली देशी पिस्तूल व दुचाकी जप्त केली. शहापूर पोलिसांनी तामगाव पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले. ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार, उपनिरीक्षक जीवन सोनवणे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार प्रमोद मुळे, पोलिस कर्मचारी विकास गव्हाड, ज्ञानेश्वर फाडके यांच्यासह पोलिस सहभागी झाले.