चोरांचा कारनामा! कंटेनर ट्रकमधून गायब झाली तब्बल १० लाखांहून अधिक किमतीची मॅगी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 03:15 PM2024-12-09T15:15:17+5:302024-12-09T15:15:56+5:30
एका कंटेनर ट्रकमधून तब्बल दहा लाखांहून अधिक किमतीची मॅगी चोरीला गेली.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कंटेनर ट्रकमधून तब्बल दहा लाखांहून अधिक किमतीची मॅगीचोरीला गेली. हा कंटेनर ट्रक भोपाळ येथे राहणारा शब्बीर नावाच्या व्यक्तीचा आहे. 'आजतक'शी बोलताना शब्बीरने सांगितलं की, २८ नोव्हेंबर रोजी गुजरातच्या अहमदाबाद येथून कटक (ओडिशा) साठी १० लाख ७१ हजार रुपये किमतीची मॅगीची पाकिटं कंटेनर ट्रकमध्ये भरण्यात आली होती.
ट्रक भोपाळला पोहोचल्यावर शब्बीरने ड्रायव्हरला फोन केला पण त्याचा फोन बंद होता. यानंतर ४ तारखेला चालकाने दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन केला आणि सांगितलं की, एका अज्ञात व्यक्तीने त्याला व क्लिनरला दारू पाजली व कंटेनर ट्रक चोरून घेऊन गेला. तपासादरम्यान कोकटा परिसरात कंटेनर ट्रक आढळून आला.
यानंतर शब्बीरने १०० नंबर डायल करून पोलिसांना फोन केला आणि पोलिसांच्या उपस्थितीत कंटेनर ट्रक पाहिला असता तो आतून पूर्णपणे रिकामा होता. याआधी १० लाख ७१ हजार रुपये किमतीची मॅगी भरून पाठवली होती. एवढेच नाही तर कंटेनर ट्रकमधील डिझेलही चोरीला गेलं. शब्बीरच्या म्हणण्यानुसार, सुमारे महिनाभरापूर्वीच चालक त्याच्याकडे कामाला आला होता.
कंटेनर ट्रक मालक शब्बीर याने पोलिसांना टोल प्लाझाचं सीसीटीव्ही फुटेज देखील दिलं आहे, ज्यामध्ये कंटेनर ट्रकचा दरवाजा बंद आहे. पण अवघ्या ५ किलोमीटर पुढे कंटेनर ट्रक असाच उभा केलेला सापडला आणि मॅगी गायब झाली होती. सध्या पोलिसांनी मालकाचा जबाब नोंदवला असून पुढील कारवाई करत असल्याची माहिती दिली.