महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 02:07 PM2024-09-25T14:07:22+5:302024-09-25T14:09:46+5:30
महालक्ष्मीच्या हत्येप्रकरणी बंगळुरू पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.
महालक्ष्मीची हत्या आणि तिच्या मृतदेहाचे ३० हून अधिक तुकडे केल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की गुन्हेगार ३० वर्षांचा आहे आणि तो ओडिशा-पश्चिम बंगाल सीमेजवळ लपला आहे. आमचं पथक आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच तो पोलिसांच्या ताब्यात येईल अस पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे.
शनिवारी शेजाऱ्यांनी प्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती दिल्यानंतर महालक्ष्मीची आई आणि मोठी बहीण महालक्ष्मीच्या घरी पोहोचली तेव्हा त्यांना फ्रिजमध्ये ३० तुकड्यांमध्ये तिचा मृतदेह आढळला. यानंतर य़ाबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. तपास सुरू करत, मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार विशेष पथकं तयार केली आहेत.
आरोपी वारंवार बदलतोय लोकेशन
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास करणाऱ्यांचं पथक आरोपीच्या लोकेशनवर पाठवण्यात आलं आहे. आम्ही आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंतच्या तपासात त्याचं वय ३० वर्षांच्या आसपास असल्याचं समोर आलं आहे. तो मूळचा ओडिशाचा आहे. घटनेपासून तो ओडिशा-पश्चिम बंगाल सीमेवर लपून बसला आहे. वारंवार तो त्याचं लोकेशन बदलत आहे.
आरोपीच्या फोनच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याची अनेक लोकेशन्स ट्रेस केली आहेत. त्या ठिकाणी पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे. याशिवाय महिलेच्या मोबाईलवरून सापडलेल्या पुराव्यांवरूनही महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. आरोपीला पळून जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळाल्याने ही हत्या काही दिवसांपूर्वी झाल्याचं म्हटलं जात आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, "अशा प्रकारची घटना मेडिकल एक्स्पर्टसाठीही एक आव्हान आहे. कारण त्यांच्याकडे संपूर्ण डेडबॉडी नसल्याने खून कसा झाला हे शोधणे आव्हानात्मक आहे. सध्या आमचा फोकस आरोपीला अटक करण्यावर आहे." या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.