Arnab Goswami: अर्णब गोस्वामींवर हक्कभंग कारवाई? प्रताप सरनाईक यांच्या प्रस्तावावर चर्चा
By हेमंत बावकर | Published: November 5, 2020 07:45 PM2020-11-05T19:45:48+5:302020-11-05T19:48:00+5:30
Arnab Goswami Arrest : अर्णब यांच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे.
अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी तुरुंगात आहेत. उच्च न्यायालयानेही जामीन न दिल्याने आज दुसऱ्य़ा दिवशीही गोस्वामी यांना अलिबागच्या मराठी शाळेत रहावे लागणार आहे. मुंबई पोलिसांनीही महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविलेला असताना आता आणखी अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार समितीची गुरुवारी बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये अर्णब गोस्वामींच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यावर चर्चा करण्यात आली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात अपमानजनक भाषा वापरल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. यासाठी 16 सप्टेंबरला महाराष्ट्र विधानसभेत अर्णब गोस्वामीविरोधात हक्कभंग प्रस्ताव देण्यात आला होता. अशाच प्रकराचा आणखी प्रस्ताव आमदार मनिषा कायंडे यांनी विधान परिषदेतही दिला होता.
या प्रस्तावांवर आज चर्चा करण्यात आली. हक्कभंग प्रस्तावावर समितीने गोस्वामी यांना चारवेळा हजर राहण्याची नोटीस पाठविल्या आहेत. मात्र, ते समितीसमोर हजर झाले नाहीत. शेवटची नोटीस 16 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी अर्णबला देण्यात आली होती. त्यांना दुपारी ३ वाजता केवळ 10 मिनिटे विधानसभेत हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी महाराष्ट्र सचिवालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये अर्णबला 16 सप्टेंबरपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात भारतीय जनता पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर्स लावले आहेत. यावर 'आणीबाणी 2.0' असा उल्लेख असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. आणीबाणी 2.0 मध्ये तुमचं स्वागत आहे, असा मजकूर बग्गा यांनी लावलेल्या पोस्टर्सवर आहे.
अर्णब गोस्वामी यांना जामिनाचा अंतरिम दिलासा देण्यास मुंबईउच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. फिर्यादी आज्ञा नाईक, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना न्यायालयाने बजावली नोटीस. उद्या दुपारी ३ वाजता अर्णब यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सध्यातरी अर्णव गोस्वामींना अंतरिम दिलासा नाहीच असं म्हणावं लागेल.
अर्णब यांना अंतरिम दिलासा नाही
अर्णब यांच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. तर दुसरीकडे अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामींना पोलीस कोठडी मिळावी म्हणून सेशन कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे अखेर अर्णब यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यामुळे उद्या दुपारी अर्णब यांच्या जामिनावर पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्याकडे सर्वाचं लक्ष आहे.