महाराष्ट्र केसरीचा वाद पोलिसांत, पंचांना धमकीचा फोन; व्हिडिओही केला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 05:08 PM2023-01-16T17:08:09+5:302023-01-16T17:41:46+5:30
कुस्ती नियोजन समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी पोलीस अधीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे,
पुणे - शनिवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आणि सोशल मीडियावर सिकंदर नावाचे वादळ घोगवले. सिकंदरवर शेखवर पंचांकडून अन्याय झाल्याची भावना सोशल मीडियातून व्यक्त होऊ लागली. तर, हार कर जितनेवाले को सिकंदर कहत है... अशा पोस्टही व्हायरल झाल्या. त्यामुळे, पंचांच्या निर्णयावर कुस्तीविश्वात आणि सोशल मीडियातून प्रश्नचिन्ह उभा होत आहे. आता, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतीला हा वाद पोलिसांत पोहोचला आहे. याप्रकरणी, स्पर्धेतील पंचांना फोन करुन धमकी दिल्यासंदर्भात कुस्ती नियोजन समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी पोलीस अधीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे,
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख, तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. या फेरीत दोन्ही गटातील मल्ल एकमेकांशी लढले. मात्र, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांची कुस्ती वादाचा विषय ठरली. त्यानंतर, या लढतीतील पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. महेंद्र गायकवाडने सेमीफायनलमध्ये जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, चर्चा सिकंदरच्या पराभवाचीच झाली. ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना रंगला. अतिशय रोमहर्षक आणि राज्याचं लक्ष लागलेल्या या सामन्यात शिवराज राक्षेनं विजय मिळवला. पण, या विजयापेक्षाही सेमीफानयलची लढत चर्चेत ठरली.
सिंकदर शेखच्या पराभवानंतर अनेकांनी सिकंदरबद्दल सहानुभूती दर्शवली. तसेच, सोशल मीडियावर त्याच्या समर्थनार्थ अनेकजण पुढे आले. आता, सिकंदरच्या कुस्तीचा वाद पोलिसात पोहोचला आहे. कारण, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंच मारुती सातव यांनी चुकीचा निर्णय दिल्याचे सांगत त्यांना फोन करुन धमकी देण्यात आली. संग्राम कांबळे असे धमकी देण्याऱ्याचं नाव असून सदर व्यक्तीपासून आमच्या जीवितास धोका असल्याचे पंच मारुती सातव आणि ज्युरी दिनेश गुंडे यांनी म्हटलं आहे. याबाबत, स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये, संग्राम कांबळे यांनी फोन करुन, स्वत:चा रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या भरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचंही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे, संबंधित व्यक्तीबद्दल पोलिसांनी योग्य निर्णय घ्यावा आणि दोन्ही पंचांना सुरक्षा पुरवावी, असेही भोंडवे यांनी तक्रारी अर्जात म्हटले आहे.