Maharashtra New DGP : राज्याच्या पोलीस दलाला मिळाले नवे बॉस, रजनीश सेठ यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 08:01 PM2022-02-18T20:01:46+5:302022-02-18T20:23:55+5:30
Rajneesh Seth appointed As New DGP : महासंचालकपदासाठी रजनीश सेठ, डॉ.वेंकटेशम आणि हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस देखील आयोगाने केली होती.
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १९८८ च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. तसेच गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी धुरा सांभाळली आहे. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबई पोलीस दलाचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त पदी कार्यरत होते. यासोबतच महासंचालकपदासाठी रजनीश सेठ, डॉ.वेंकटेशम आणि हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस देखील आयोगाने केली होती.
२०२२ मध्ये सेवानिवृत्त होणारे महाराष्ट्रातील IPS अधिकारी
१. संजय पांडे - जून २०२२
२ के वेंकटेशम - ऑगस्ट २०२२
३ परमबीर सिंह - जून २०२२
४. हेमंत नगराळे - ॲाक्टोबर २०२२
५. राजेंद्र सिंह - एप्रिल २०२२
५ सुबोध जैयस्वाल - सप्टेंबर २०२२ ( केंद्रीय नियुक्तीवर)
६ एस जगन्ननाथन - मे २०२२
७ आर. सेनगांवकर - ॲाक्टोबर २०२२
८ एम एम रावडे - मार्च २०२२
९ एम के भोसले जून २०२२
१० सुनील कोल्हे - ऑगस्ट २०२२
रजनीश सेठ यांच्याबरोबरच मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि होम गार्डचे महासंचालक के. व्यंकटेशम यांचेही नाव राज्याच्या डीजीपी पदासाठी चर्चेत होते. हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर एप्रिल २०२१ पासून डीजीपी पदाचा कार्यभार संजय पांडे यांच्याकडे प्रभारी म्हणून देण्यात आला होता.
तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगानेही संजय पांडे या पदासाठी पात्र नसल्याची शिफारस केली होती. संजय पांडे यांनी सरकारी सेवेतून मधल्या काळात ब्रेक घेवून खासगी क्षेत्रात सेवा केली होती. त्यामुळे सुमारे दोन वर्षे सेवेत नसलेल्या अधिकाऱ्याला राज्याच्या पोलीस महासंचालक करण्यास विरोध केला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. सुबोध जयस्वाल यांची बदली सीबीआयचे संचालक म्हणून करण्यात आल्यानंतर सरकारने राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सुबोध जयस्वाल यांची प्रभारी महासंचालक म्हणून नियुक्ती केली.
गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यूपीएससीला पत्र लिहून निवड समितीला पोलीस महासंचालक पदासाठी संजय पांडे यांच्या नावाचा विचार करण्याची विनंती केली, अशी माहिती राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाला गेल्या सुनावणीत दिली होती. राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर कायमस्वरूपी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते.