म्हाडाचे स्वस्त घर आजोबांना पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 02:36 AM2019-06-03T02:36:44+5:302019-06-03T06:22:18+5:30

३७ लाखांची फसवणूक : नेहरूनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Maha's cheap house fell in love with grandfather | म्हाडाचे स्वस्त घर आजोबांना पडले महागात

म्हाडाचे स्वस्त घर आजोबांना पडले महागात

Next

मुंबई : म्हाडाचे अधिकारी असल्याचे भासवून म्हाडाच्या स्वस्त घराचे आमिष दाखवून ठगांनी ६० वर्षांच्या आजोबांकडून ३७ लाख ७३ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार अ‍ॅण्टॉप हिलमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अ‍ॅण्टॉप हिल येथील कान्हेरनगर परिसरात वसंत विष्णू मस्तुद (६०) हे कुटुंबीयांसोबत राहतात. जुलै २०१५ मध्ये आरोपींनी म्हाडाचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याशी ओळख केली. त्यांना म्हाडामध्ये स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या उच्च राहणीमानाला भुलून त्यांनीही तयारी दर्शवली. त्यानुसार, आरोपींनी म्हाडाची बनावट कागदपत्रे तयार करून नोव्हेंबर २०१८ पर्यंत मस्तुद यांच्याकडून ३७ लाख ७३ हजार ७०० रुपये उकळले.

हक्काच्या घरात लवकरच जाणार असे स्वप्न त्यांनी रंगविले. मात्र, पैसे भरूनही घर मिळत नसल्याने त्यांना संशय आला. आरोपीही टाळाटाळ करत असल्याने त्यांनी पैसे परत करण्याबाबत तगादा लावला. पैसे मिळाले नाहीत. अखेर, शनिवारी त्यांनी नेहरूनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नेहरूनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी दिलेली कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेत, तपास सुरू आहे. 

वृद्ध ठरताहेत सॉफ्ट टार्गेट
यापूर्वीही म्हाडाचे अधिकारी, कर्मचारी असल्याचे भासवून नागरिकांना गंडा घातल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तुम्हीही अशा टोळीच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी कागदपत्रे, घराची खातरजमा करा. कुणावरही विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. यात वृद्धांना जास्त टार्गेट केले जाते. त्यामुळे त्यांनी याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे, असेही पोलिसांनी नमूद केले.

Web Title: Maha's cheap house fell in love with grandfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.