प्लॅटधारकाची कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीस बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 09:32 PM2019-11-22T21:32:28+5:302019-11-22T21:33:35+5:30
मुंबई - प्लॅटधारकाच्या प्लॅटवर बँकेतून बनावट कागदपत्रांच्या आधारे चार कोटीचे कर्ज मंजूर करून घेऊन प्लॅटधारकास चुना लावल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांच्या ...
मुंबई - प्लॅटधारकाच्या प्लॅटवर बँकेतून बनावट कागदपत्रांच्या आधारे चार कोटीचे कर्ज मंजूर करून घेऊन प्लॅटधारकास चुना लावल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांच्या पथकाने याआधी एका आरोपीला अटक केलेली आहे. आता या प्रकरणात हार्दिक नितीन गोठी याचा समावेश असून या मुख्य आरोपीस अटक करून त्याला वांद्रे येथील कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच गुन्ह्यात पूर्वी पोलिसांनी प्रकाश हिराराम मारू याला अटक केली आहे. या फसवणुकीच्या प्रकरणात गोठी याला ४० लाखाची रक्कम मिळाली होती.
तक्रारदार वांद्रे येथे राहणार असून त्यांच्या मालकी हक्काचा आलिशान फ्लॅट त्यांनी विक्रीसाठी काढला होता. त्याकामासाठी तक्रारदार यांचा मित्र अरिफ सय्यद याला त्यांनी सांगितले. आरिफ आणि इस्टेट एजंट यांना तक्रारदार यांनी माहिती दिली. साधारण जून २०१७ मध्ये आरिफ सय्यद याच्या ओळखीचा इसम असलेल्या अब्दुल्ला खान उर्फ पप्पू याने तक्रारदार यांना संपर्क साधला आणि सांगितले की, त्याचा मित्र नरेंद्र अगरवाल याला हा फ्लॅट घेण्यात रस आहे. तसेच पप्पू तक्रारदाराकडे त्यासारख्या राहत्या घरी अगरवालला घेऊन गेला. त्यावेळी हा फ्लॅट ५ कोटी ४२ लाख रुपयांना विकण्याचे ठरले. त्यावेळी फ्लॅट खरेदीस इच्छुक असलेल्या नरेंद्र अगरवाल याने रक्कम जास्त असल्याने बँकेचे कर्ज घ्यावे लागेल असे सांगितले.
त्यावेळी नरेंद्र यांचा मित्र राकेश चक्रवर्ती याने बँकेतून कर्ज काढून देण्याची तयारी दाखविली. फ्लॅटच्या खरेदी आणि विक्रीचा व्यवहार करून करार करू असे सांगून टोकण म्हणून १० लाखाची रक्कम तक्रारदार यांना द्यावी असा व्यवहार ठरला. उर्वरित रक्कम ५ कोटी ३२ लाख रुपये कर्ज काढून देण्याचा निश्चित केले. आणि कर्जाची प्रक्रिया सुरु झाली. २० जूनला राकेशने १० लाखाची रक्कम बँकखात्यावर ट्रान्स्फर केली. त्यानंतर घरविक्रीचं अनोंदणीकृत करारनामा करण्यात आला. राकेशने बँकेने ४ कोटी ११ लाख रुपये कर्ज मंजूर केल्याचे सांगितले. काही रक्कम कमी असल्याने व्यवहार रद्द करा असा सूर तक्रारदाराने काढला. त्यावेळी उर्वरित रक्कम दिल्यानंतर ही रक्कम मिळताच कॅन्सलेशन डिड करण्याचे सांगितले. तक्रारदाराने विश्वास ठेवून नऊ ब्लॅक चेक घेतले आणि राकेश चक्रवती याला दिले. यावेळी दलाली म्हणून पप्पूला ८ लाख ८० हजाराचे तीन धनादेश दिले. बँकेत ४ कोटी पाच लाख रुपये जमा झाले होते. ही रक्कम जमा होताच राकेशने मारबलेक्स सिटी इन्फ्राचे अब्दुल्ला खान उर्फ पप्पू, विदेही डायकेम, प्रकाश हिराराम, वैदेही सहकारी पेठ, राकेश चक्रवर्ती यांचे श्री साई सी फूड्स, हार्दिक नितीन गोठी, नरेंद्र अगरवाल, खाते क्रमांक ००२००००२४९४३५ आणि चामुंडा इंटरप्राईझेस या नऊ बँक खात्यात चार कोटी पाच लाख रुपये वळविण्यात आले आणि तक्रारदार असलेल्या घरमालकाला गंडा घालण्यात आला. तक्रारदाराने या व्यवहारानंतर राकेशला फोन करून फ्लॅटचे कागदपत्र मागितले. तेव्हा सर्व कागदपत्र पैसे परत केल्यानंतर घेऊन येतो असे सांगितले.