मनसे नेत्याच्या हत्येतील मुख्य आरोपी गजाआड; एन्काउंटरची भीती असल्यानं धरले अधिकाऱ्यांचे पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 11:55 AM2020-11-13T11:55:12+5:302020-11-13T11:59:45+5:30

राकेश पाटील हत्या प्रकरण, मोबाइल ट्रँकिंगवरून पोलिसांनी काढला माग, पनवेलमध्ये केली अटक

Main accused in the murder of Ambernath MNS leader Rakesh Patil is arrested by police in Panvel | मनसे नेत्याच्या हत्येतील मुख्य आरोपी गजाआड; एन्काउंटरची भीती असल्यानं धरले अधिकाऱ्यांचे पाय

मनसे नेत्याच्या हत्येतील मुख्य आरोपी गजाआड; एन्काउंटरची भीती असल्यानं धरले अधिकाऱ्यांचे पाय

googlenewsNext

पंकज पाटील

अंबरनाथ – डी. मोहन याला पनवेलमधून अटक केली असली तरी फरार असल्यापासून त्याच्या मनात एन्काऊंटरची भीती होती, त्यामुळेच अंबरनाथ पोलिसांना याला अटक करताच तो पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरून त्यांच्याकडे जीवदानाची विनंती करत होता. मला न्यायालयात न्या, माझे एन्काऊंटर करू नका, अशी विनंती तो करत होता ,पोलिसांनी त्याला हटकल्यावर त्याने कोणताही प्रतिकार केला नाही.

२८ ऑक्टोबर रोजी अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील जैनम रेसिडेन्सी भागात डी. मोहन आणि त्याच्या साथीदारांनी मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली, यानंतर तो आणि त्याचे अन्य साथीदार दोन गाड्यांमधून पळून गेले. सीडीआर लोकेशननुसार पोलिसांना त्याचा मार्ग समजल्यानंतर पोलिसांनी मुरबाडला तातडीने नाकाबंदी केली, मात्र ही नाकाबंदी लागायच्या काही मिनिटे आधी डी. मोहन असलेली गाडी तिथून पुढे निघून गेली, तर अन्य चार साथीदार असलेली गाडी पोलिसांनी पकडली, ज्यातून चार आरोपींना हत्येनंतर काही तासांतच बेड्या ठोकण्यात आल्या. यानंतर मात्र डी. मोहन याने आपला मोबाईल बंद केला.

नाकाबंदीतून निसटल्यानंतर डी. मोहन हा त्याचे दोन साथीदार भरत पाटील, रमेश डोबारी आणि चालक विलास खैरे यांच्यासह थेट इंदूरला गेला, तिथे काही काळ वास्तव्य करून हे आरोपी ओंकारेश्वरला गेले, मात्र या दरम्यान डी मोहनच्या गाडीचा ६३६३ हा क्रमांक लक्षात येऊन पकडले जाण्याची भीती त्यांना होती, त्यामुळे ओंकारेश्वरहून त्यांनी धुळ्याजवळच्या शिरपूरमध्ये गाडी आणि ड्रायव्हर सोडले. जळगावला आरोपी भरत पाटील याच्या गावी गेले. तिथून भाड्याची गाडी करून त्यांनी नागपूर गाठले, पोलिसांनी तिघांचे नातेवाईक,कामगारांचे फोन नंबर ट्रँकिंगवर ठेवले, ज्या ४ नंबरवरून फोन येत होते, त्यामुळे या चार नंबरवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले.

नागपूरला काही दिवस राहिल्यानंतर हे सर्व रेल्वेने पनवेलला आले, याचदरम्यान पोलिसांनी नंबर ट्रँकिंगवरून हे सर्वजण प्रवास करत असल्याचा निष्कर्ष काढला, हे पनवेललाच येतील अशी गुप्त माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला आणि अखेर या तिघांना अटक केली.

ठरवून हत्या केली नाही

राकेशची हत्या ही ठरवून केलेली नसल्याची कबुली डी. मोहन याने दिली आहे, राकेश आणि आपल्यात व्यावसायिक वाद असल्याने आपण त्याला भेटायला गेलो होतो, मात्र यावेळी राकेशने वादावादीत आपल्याला कानाखाली मारल्याने माझ्या सहकाऱ्यांनी चिडून त्याच्यावर हल्ला केला अशी माहिती त्याने पोलिसांना दिल्याचं सूत्रांनी सांगितले.

Web Title: Main accused in the murder of Ambernath MNS leader Rakesh Patil is arrested by police in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.