मैत्रेय कंपनी फसवणूक प्रकरण : मुंबईच्या सक्षम प्राधिकारीकडे पाठविला अहवाल, राज्यभरात २७ ठिकाणी गुन्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 05:44 PM2018-08-17T17:44:37+5:302018-08-17T17:45:02+5:30

मैत्रेय कंपनीच्या राज्यातील उघड मालमत्तेचा लेखाजोखा अहवाल मुंबईचे सक्षम प्राधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येत आहे. अमरावतीत आर्थिक गुन्हे शाखेने मैत्रेयची १२५ कोटींची  मालमत्ता उघड केली. त्याचा लेखाजोखा अहवाल १४ आॅगस्ट रोजी पाठविण्यात आला. 

 Maitreya Company Cheating Case: Report sent to the competent authority of Mumbai, 27 Crime Offenses across the state | मैत्रेय कंपनी फसवणूक प्रकरण : मुंबईच्या सक्षम प्राधिकारीकडे पाठविला अहवाल, राज्यभरात २७ ठिकाणी गुन्हे 

मैत्रेय कंपनी फसवणूक प्रकरण : मुंबईच्या सक्षम प्राधिकारीकडे पाठविला अहवाल, राज्यभरात २७ ठिकाणी गुन्हे 

googlenewsNext

अमरावती : मैत्रेय कंपनीच्या राज्यातील उघड मालमत्तेचा लेखाजोखा अहवाल मुंबईचे सक्षम प्राधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येत आहे. अमरावतीत आर्थिक गुन्हे शाखेने मैत्रेयची १२५ कोटींची  मालमत्ता उघड केली. त्याचा लेखाजोखा अहवाल १४ आॅगस्ट रोजी पाठविण्यात आला. 
     गुंतवणूकदारांना गुंतवणुकीतून दुप्पट, तिप्पट पैसे करण्याचे आमिष दाखविणाºया मैत्रेय कंपनीविरुद्ध राज्यभरात २७ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद झाली आहे. राज्यभरातील तब्बल ४६ लाख गुंतवणूकदारांची २८२० कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. मैत्रेयच्या राज्यभरातील ३०८ मालमत्ता उघड झाल्या असून, त्यासंदर्भात राज्यभरातील विविध गुन्ह्यांत तक्रारी किती, फसवणुकीची रक्कम किती, अशा प्रकारची माहिती सक्षम प्राधिकारी यांच्याकडे संबंधित पोलीस पाठवित आहेत. सक्षम प्राधिकारी म्हणून मुंबईचे उपजिल्हाधिकारी तरुण खत्री यांची नियुक्ती झाली असून, त्यांच्यामार्फत आता मंत्रालयस्तर व न्यायालयीन परवानगीनंतर मैत्रेयची मालमत्ता लिलाव करून गुतंवणूकदारांचे पैसे परत करण्याची प्रकिया सुरू होणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. 

अमरावतीत १ लाख ७२ हजार गुंतवणूकदार
मैत्रेय कंपनीविरुद्ध अमरावतीच्या कोतवाली ठाण्यात पहिली तक्रार मार्च २०१६ ला नोंदविण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी वर्षा सत्पाळकर, जनार्दन परूळेकर, विजय तावरे, लक्ष्मीकांत नार्वेकर (सर्व रा.वसई, मुंबई), हर्षद पाटील (रा. अमरावती) व प्रमोद डाखोरे (रा. चंद्रपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे ४२ हजार तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये नागरिकांची ८५ कोटींनी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.  आर्थिक गुन्हे शाखेने पाच आरोपींना अटक केली, तर वर्षा सत्पाळकर अद्यापही पोलिसांच्या हाती लागली नाही. 

असोसिएशनने घेतली गृहसचिवांची भेट
राज्यस्तरावरील एका असोसिएशनने १३ आॅगस्ट रोजी मुंबई येथे गृहविभागाच्या उपसचिवांची भेट घेतली. त्यानंतर असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी कमिटीचे प्रमुख उपजिल्हाधिकारी खत्री यांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली. मैत्रेयच्या आतापर्यंतच्या ३०८ प्रॉपर्टी उघड झाल्या असून, त्यांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर मालमत्तेच्या लिलावासाठी कोर्टात विक्रीच्या परवानगीसाठी प्रकरणे जाईल.  परवानगी मिळाल्यानंतर विक्री करून लवकर ‘रिपेमेंट’ प्रक्रिया सुरू केले जाईल. मात्र, कंपनीकडे जे कस्टमर डाटा आहे त्यांतील खरे ग्राहक  कोण आहेत, याची तपासणी सुरु असल्याची माहिती असोसिएशनला मिळाली. असोसिएशनच्यावतीने डी. बी पाटील, सुभाष पाटील, नीलेश वाणी, मंगलसिंह परदेशी, सांगलीचे विनायक चव्हाण, दत्ता शिंगाडे, महेंद्र ऊर्फ पिंटू दर्डा व सर्व सदस्य उपस्थित होते.

Web Title:  Maitreya Company Cheating Case: Report sent to the competent authority of Mumbai, 27 Crime Offenses across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.