मोठी दुर्घटना टळली, राजुर घाटात ट्रक उलटला; कारमधले प्रवासी थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 03:33 PM2022-07-15T15:33:58+5:302022-07-15T15:36:18+5:30
Accident Case : बुलडाणा-मोताळा रोडवरील राजुर घाटातील घटना
बुलडाणा : मोताळ्याकडे जाणारा ट्रक राजुर घाटातील एका वळणावर उलटला. ही घटना १५ जुलै रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान घडली. यामध्ये ट्रकचा चालक केबिनमध्येच अडकला होता. मात्र, नागरिकांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर चालकास ट्रकमधून काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
बुलडाण्याहून मोताळ्याकडे जाणारा ट्रक क्रमांक (एमपी-०९-एचजी-१५५५) शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या राजुुर घाटातील एका वळणावर उलटला. विशेष म्हणजे, ट्रकची गती अधिक असल्याने ट्रक चालक गुरमितसिंह याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात ट्रकमधील मुकेश बाबर हे किरकोळ जखमी झाले असून, ट्रक चालक गुरमितसिंह यांना घटनेच्या १५ मिनिटांनंतर ट्रकच्या केबिनमधून काढण्यात नागरिकांना यश आले. यावेळी घटनास्थळावर रुग्णवाहिका दाखल होऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.
कार थोडक्यात बचावली
बुलडाण्याहून मोताळ्याकडे जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने, घाटातील एका वळणार उलटत असताना, मोताळ्याहून बुलडाण्याकडे येणाऱ्या कार क्रमांक (एमएच-२८-एझेड-७२८०) ही कार थोडक्यात बचावली. ट्रक उलटत आहे, हे लक्षात येताच, कार चालकाने वाहनाची गती वाढवून ट्रकच्या बाजूला जात अपघात टाळला. ट्रक जर कारवर आदळला असता, तर कारमधील तीन ते चार जणांच्या जीवावर बेतली असती, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र, या सर्व घटनेदरम्यान कारला कट लागल्याने कारचेही नुकसान झाले आहे.