मार्बल्सच्या आडून ड्रग्सची तस्करी; ३०० कोटी हून अधिक रुपयांचे हेरॉईन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 08:44 PM2022-07-15T20:44:06+5:302022-07-15T20:46:21+5:30
Drugs Case : कंटेनर नवकार लॉजीस्टीक नवीन आजिवली गाव पनवेल येथे उतरविण्यात आल्याची गोपनीय माहिती अत्यंत वेगाने मिळाली होती.
पनवेल : परदेशातुन अवैधरित्या आयात केलेले ३६२.५९ कोटी रुपयांचे हेरॉईन नामक अंमली पदार्थ साठा नवी मुंबई पोलिसांनीपनवेलजवळील अजिवली हद्दीतील नवकार लॉजिस्टिकमधून हस्तगत करण्यात आला आहे. हा राज्यातील मोठा साठा असल्याचे समजते.
गुन्हे शाखा, नवी मुंबई येथे पंजाब पोलीसांचे स्पेशल ऑपरेशन सेल कडुन पोलीस आयुक्तालय हद्दीतील न्हावाशेवा पोर्ट, नवी मुंबई येथे दुबई येथून कंटेनर मध्ये अंमली पदार्थ दडवून १५ डिसेंबर २०२१ रोजी भारतात आणल्याची व सदरच्या कंटेनर मधील माल घेण्यासाठी अद्यापही कोणी आले नसल्याची माहीती पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा यांना मिळाली होती. पोलीस आयुक्त, बिपीनकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप आयुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, नवी मुंबईच्या पोलीस पथकाने सदर कंटेनरचा शोध घेतला असता सदरचा कंटेनर हा दुबई येथुन न्हावाशेवा पोर्ट येथे आयात केला असल्याचे व सदर कंटेनर नवकार लॉजीस्टीक नवीन आजिवली गाव पनवेल येथे उतरविण्यात आल्याची गोपनीय माहिती अत्यंत वेगाने मिळाली होती.
सदर कंटेनर मधील आयात केलेल्या मार्बल्स घेवून जाण्यास कोणीही दावा न केल्याने सदर कंटेनरचा संशय आल्याने कंटेनरची पंचासमक्ष पाहणी करण्यात आली असता त्यामधील मार्बल्स पुर्णपणे कंटेनरच्या बाहेर काढल्यानंतर कंटनरचे दरवाजाला असलेल्या फ्रेमची बारकाईने पाहणी केली असता फ्रेममध्ये कोणतातरी अंमलीपदार्थ लपविला असल्याचा संशय बळावल्याने कंटेनरचा दरवाजा व त्यावरील फेम कटर मशिनच्या सहाय्याने कापण्यात आले असता त्यामध्ये हेरॉईन नामक अंमलीपदार्थ असलेले ७२.५१८ कि.ग्रॅ. वजनाचे व सुमारे ३६२.५९ कोटी रुपये किंमतीचे प्लॅस्टीक कागदाच्या वेष्टनामध्ये पॅक केलेले एकुण १६८ पॅकेट्स मिळुन आले. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापरावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २२ (क), २३ (क), २९ कलमान्वये सदरचा (अंमली पदार्थ (हेरॉईन) संगनमत करून अवैधरित्या भारतात आयात करणारे निर्यात करणारे, शिपर्स व आयात व निर्यात दरम्यान प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्या इसांमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील तपास गुन्हे शाखा, (विशेष तपास पथक ) करत आहेत.